

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोहाचा भाग म्हणून यंदा स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध तुरुंगातून 50 टक्क्यांहून अधिक शिक्षा भोगलेल्या तब्बल 186 कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात तीन टप्प्यांत शिक्षेत देण्यात आलेल्या विशेष माफीमुळे तब्बल 581 कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 50 टक्क्यांहून अधिक शिक्षा भोगलेल्या, तुरुंगातील चांगली वर्तणूक आणि इतर निकषांनुसार पात्र कैद्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे विशेष माफी देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार अमृतमहोत्सवी वर्षाच्या पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्ट 2022 रोजी 206 जण, दुसर्या टप्प्यात म्हणजे यावर्षी 26 जानेवारी 2023 रोजी 189 जणांना विशेष माफी देऊन तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. आता तिसर्या टप्प्यात 15 ऑगस्ट 2023 रोजी एकूण 186 कैद्यांना सोडण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश राज्यातील सर्व कारागृहांना 1 ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत. माफी देण्यात आलेल्यांमध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह (34), नागपूर मध्यवर्ती कारागृह (23), औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह (24), अमरावती खुले कारागृह (19), सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह (13) येथील सर्वाधिक कैद्यांचा समावेश आहे.