

लंडन : ज्या वयात आयुष्यातील कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार अद्याप पूर्ण मिळालेला नसतो, विवाह करू शकत नाही, ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकत नाही, अशा वयात एका युवकाने असा पराक्रम केला की, सारे जग स्तिमित झाले. वास्तविक, ड्रायव्हिंग लायसन्सही 18 व्या वर्षी मिळते. पण, या अवलियाने 17 व्या वर्षांत फक्त विमानोड्डणाच केले नाही तर चक्क 52 देशांची सैरही केली!
ब्रिटनच्या मॅक रुदरफोर्डची ही कहाणी आहे. त्याने अवघ्या 5 महिन्यांत स्वत: विमान चालवत 52 देश पालथे घातले. असे करत त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये स्थानही प्राप्त केले. मॅकचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. मात्र, नंतर त्याचे पालनपोषण बेल्जियममध्ये झाले आहे.
17 वर्षे, 64 दिवस वय असताना रुदरफोर्डने जगभरातील 52 देशांची परिक्रमा करणारा सर्वात युवा पायलट म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने सिंगल इंजिन विमानासह मार्चमध्ये आपल्या प्रवासाची सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे मॅकची बहीण जारा हिने देखील 19 वर्षे 199 दिवस वय असताना असा कारनामा केला आहे. तिच्यामुळेच रुदरफोर्डला देखील प्रेरणा मिळाली. बहिणीकडून विविध मार्गांची माहिती घेतल्यानंतर त्याने हा प्रवास सुरू केला.
मॅकला या प्रवासादरम्यान अनेक अडचणी आल्या. पण, त्या सर्वांवर त्याने यशस्वी मात केली. खराब हवामानामुळे तो कित्येकदा अडचणीत आला. पण, यावरही सुदैवाने मार्ग निघाला.
मॅकने 23 मार्च 2022 रोजी बल्गेरियातील सोफिया येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि 5 महिने जगभराचा प्रवास केल्यानंतर 24 ऑगस्ट 2022 रोजी सोफियालाच परतत त्याने आपला प्रवास पूर्ण केला. यादरम्यान आपला 17 वा वाढदिवसही त्याने विमानातच साजरा केला.