कळंबा जेलला कोणी वाली आहे की नाही..?

file photo
file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : अंमली पदार्थसद़ृश गांजा, मोबाईलसह अन्य संशयास्पद वस्तू सहज उपलब्ध होण्याचे हमखास ठिकाण म्हणजे मध्यवर्ती कळंबा कारागृह… 25 एकर क्षेत्रांत चारही बाजूला भक्कम तटबंदी… सव्वाशेवर सुरक्षा रक्षकांचा रात्रं-दिवस कडेकोट पहारा असतानाही चार भिंतीआड कैद्यांकडे मोबाईलसह मुबलक गांजाही आढळून येतो. 1 जानेवारी ते 31 ऑगस्टअखेर 17 मोबाईल, पाचवेळा गांजा, मुबलक चार्जर अन् ढीगभर सीमकार्ड आढळून आली आहेत. कारागृहाची लक्तरे वेशीवर टांगली जात असून यंत्रणेची पुरती नाचक्की होत आहे. संवेदनक्षम कळंबा कारागृहाला कोणी वाली आहे की नाही..? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

अबब…मोक्कातील आरोपीकडे 4 मोबाईल, सीमकार्ड

शनिवार दि.19 ऑगस्टला कारागृह पोलिस मुख्यालय आणि कळंबा कारागृह प्रशासनाने कारागृहातील बरॅकची झाडाझडती घेतली. त्यात मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या आणि कळंबा कारागृहात बंदिस्त असलेल्या तीन आरोपींकडे चार मोबाईल आढळून आले.

12 ऑगस्टला आणखी तीन मोबाईल हस्तगत

सोमवार दि.21 ऑगस्टला कारागृहातील झडतीत आणखी तीन मोबाईल हँडसेट, सीमकार्ड सुरक्षा पथकाला आढळून आले. त्यात पेनाच्या टोपणाइतक्या लहान आकाराचा हँडसेट मिळाला. बुधवार दि. 29 ऑगस्टला कारागृहातील स्वयंपाकगृह परिसरात शौचालयाच्या पाठीमागील बरॅकच्या बाजूस इलेक्ट्रिक चार्जिंग सर्किट आढळून आले. खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेले हिरवे गवत होते.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता

एकेकाळी कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गुन्हेगारी टोळ्यांना कमालीची धास्ती होती. मुंबई, पुण्यानंतर कळंबा कारागृहात प्रशासनाची कडवी शिस्त होती. मात्र, अलीकडच्या काळात प्रशासनांतर्गत कच्च्या दुव्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कळंबा कारागृहात एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक घटना घडत असतानाही जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींचे ढिसाळ व्यवस्थापनाकडे लक्ष नाही की, त्याविरुद्ध 'ब्र' काढत नाहीत. त्याचाच गुन्हेगारी टोळ्या गैरफायदा घेत आहेत.

कारागृहातून गुन्हेगारी कारवायांवर 'रिमोट'

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, कोकणसह विविध राज्यांतील एव्हाना विदेशातीलही कैदी कळंबा कारागृहात कारावास भोगत आहेत. संघटित टोळ्यांतील साडेचारशेंवर कैद्यांचा कारागृहात भरणा आहे. काही टोळ्यांचे म्होरके कळंबा जेलमधून गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवत आहेत. सांगलीतील नालसाब मुल्ला याच्या खुनाची गेम कळंबा कारागृहात झाली. इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळीची सूत्रे कळंबा कारागृहातून हलवली जात आहेत. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या टोळ्यांतील गुन्हेगार थेट कळंबा कारागृहातून दहशत निर्माण करीत आहेत.

इलेक्ट्रिक चार्जिंगमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेला धोका!

अर्ध गोलाकार टेनिस बॉलमधून लाल-पिवळ्या रंगाची इलेक्ट्रिक वायर बाहेर काढण्यात आली होती. त्यास चार्जिंगचे इलेक्ट्रिक सर्किट जोडण्यात आले होते. त्याला कनेक्टरही जोडण्यात आला होता. सर्किटला जोडलेली चार्जिंग नॉब, काळ्या रंगाची बॅटरीही आढळून आली होती. अनोळखी व्यक्तीने कारागृह आवारात टाकलेल्या संबंधित वस्तूमुळे कारागृहाच्या सुरक्षेला प्रसंगी धोकाही निर्माण होऊ शकला असता. संशयास्पद वस्तू कोणी व कोणासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा दावा करणार्‍या कारागृहात आणली, हा तपासाच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news