

पणजी, पुढारी वृत्तसेवा : देशात जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या 2023 मध्ये याच कालावधीतील संख्येपेक्षा 166 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. जी 20 पर्यटन कार्यगट बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, अजय भट्ट, राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री रेड्डी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 पर्यटन कार्यगटाच्या बैठका झाल्या. यामध्ये गुजरातमधील कच्छचे रण येथे पहिली बैठक, पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे दुसरी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे तिसरी बैठक झाली. या बैठकांमध्ये जगभरातील तज्ज्ञ, उद्योजक आणि नेत्यांसोबत विविध पर्यटन प्रकारांबाबत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि सकारात्मक चर्चा झाली.
ते म्हणाले, समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक सामर्थ्याला योग्य मान्यता मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार 2014 पासून पर्यटनाला चालना देत आहे. प्राचीन काळापासून जगाच्या कानाकोपर्यातील पर्यटकांना स्वत:चा शोध घेण्यासाठी भारत हे नेहमीच लोकप्रिय ठिकाण राहिले आहे.
मंत्री नाईक म्हणाले की, गोवा हे सुट्टीचा काळ व्यतीत करण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. इथे पाहण्यासारख्या विविध गोष्टी आहेत. केंद्राने साहसी पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले आहे. यामुळे भारत साहसी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणार आहे. जी – 20 पर्यटन कार्यगटाच्या गेल्या तीन वर्षांतील प्रयत्नांवर आधारित पर्यटनासाठी गोवा आराखडा (गोवा रोड मॅप) तयार केला आहे. शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक पर्यटन क्षेत्राच्या निर्मितीसाठी गोवा प्रमुख मार्गदर्शक ठरणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, विविध प्रदेशांमधील पर्यटकांना वर्षभर आकर्षित करण्यामध्ये गोव्याने महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. गोवा हे 'पर्ल ऑफ द ओरिएंट' म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करते. गोवा सुंदर समुद्र किनारे, चैतन्यमय नाईटलाईफ, साहसी खेळ, जागतिक वारसा असलेला पश्चिम घाट आणि आकर्षित करणारे धबधबे, शांत बॅकवॉटर, योग आणि निरामयता, स्वादिष्ट खाद्य संस्कृती आणि अद्वितीय संस्कृती आणि वारसा, यासाठी देखील ओळखले जाते.
ते म्हणाले की, गोवा हे समुद्र किनार्यावरील नंदनवन असून ये प्रत्येकाला भरभरून देते. 'मेक इन गोवा फॉर द ग्लोब' या दृष्टिकोनातून गोवा क्रुझ पर्यटनामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रणी भूमिका निभावत आहे. क्रुझ पर्यटन उद्योगाला बळकटी देण्यासाठी उद्योजकांनी गोव्यात गुंतवणुक करावी. सागरी उद्योगाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचे पहिले सागरी क्लस्टर गोव्यात सुरू करण्यात आले आहे.
गोवा जाहीरनामा ही अभिमानास्पद बाब
मुख्यमंत्री म्हणाले की, या बैठकीत गोवा रोड मॅप जाहीरनामा जाहीर केला जाणार असून तो संयुक्त राष्ट्रातही पाठवला जाणार आहे. सगळ्या गोवेकरांसाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. राज्यात झालेल्या जी 20 बैठकींचा भविष्यकाळात पर्यटनासाठी नक्कीच फायदा होणार आहे.