

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने मंगळवारी ताफ्यातील 200 बस म्हणजे 10 टक्के बस कमी केल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी 1440 बस फक्त रस्त्यावर धावल्या.
राज्यपालांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पुण्यात मंगळवारी डेक्कन ते लाल महालपर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लाल महालात सभा तर संपूर्ण पुणे शहर बंद करण्यात आले होते. त्यातच काही शाळांनी उत्स्फूर्तपणे बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या. त्यामुळे नेहमीपेक्षा मंगळवारी पीएमपी प्रवाशांची संख्या कमी होणार होती. हे लक्षात आल्यामुळे पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील 200 बस मंगळवारी कमी सोडल्या. इतर वेळेस दररोज पीएमपीच्या ताफ्यातील 1650 बस रस्त्यावर धावतात. सोमवारी रिक्षा संपाच्या पार्श्वभूमीवर या बस गाड्यांमध्ये 100 ने वाढ करण्यात आली होती. यावेळी मार्गावरील बसची संख्या 1750 झाली होती. मंगळवारी मात्र पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर ही संख्या 200 ने कमी करण्यात आल्याने 1440 बस रस्त्यावर धावल्या.