इचलकरंजी मध्ये १० महिन्यांत १३ मर्डर! हल्लेखोरांच्या कृत्याने शहर हादरले

इचलकरंजी मध्ये १० महिन्यांत १३ मर्डर! हल्लेखोरांच्या कृत्याने शहर हादरले
Published on
Updated on

'महाराष्ट्राचे मँचेस्टर' अशी ख्याती असलेल्या वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजी शहरासह परिसरात गुन्हेगारी बोकाळली आहे. जानेवारी ते 23 ऑक्टोबर 2021 या काळात संघटित गुन्हेगारी, काळ्या धंद्यांतील वर्चस्व आणि सूड चक्रातून भरचौकात 13 जणांचे खून पडले आहेत.

वाढत्या खूनसत्रामुळे इचलकरंजी मधील कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. राजकीय आश्रय आणि काळ्या धंद्यांतील अफाट मिळकतीमुळे संघटित टोळ्या मुजोर बनल्या आहेत. गुंडांनी शहर डोक्यावर घेतले असतानाही स्थानिक पोलिस यंत्रणा हातावर घडी घालून बसली.

कबनुरातील संदीप मागाडे, शुभम कमलाकरपासून अलीकडच्या काळात हॉटेल व्यावसायिक संतोष ऊर्फ पप्पू जाधव यांच्या हत्येनंतर रविवारी मध्यरात्री झालेल्या संदीप घट्टे याच्या अमानुष खुनाने शहर हादरले आहे. इचलकरंजी, शहापूरसह परिसरात एकापाठोपाठ एक अशा थरारक घटना घडत असतानाही पोलिस यंत्रणा ढिम्म आहे. 'वर्दीचा धाक'च राहिला नाही, अशीच स्थिती आहे.

'मौनीबाबां'ची भूमिका शहर हिताला मारक

भरदिवसा बेधडक होणार्‍या खुनाच्या मालिका, जीवघेणे हल्ले, खंडणी वसुली, खासगी सावकार आणि तस्करी टोळ्यांची दहशत सर्वसामान्य, कष्टकर्‍यांसह उद्योग-व्यावसायिकांची डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मौनीबाबांची भूमिका शहराच्या हिताला मारक ठरणारी आहे. गुंडांच्या दहशतीमुळे सर्वच घटकांत असुरक्षिततेची भावना आहे.

10 महिन्यांपासून इचलकरंजी परिसर अशांत

जानेवारी ते 23 ऑक्टोबरअखेरचे इचलकरंजीसह परिसरात खूनसत्रातील बळी : संदीप मागाडे (कबनूर), शुभम कमलाकर (कोरोची), अजय कांबळे (इचलकरंजी), किशोर भोसले (यड्राव), खून करून तरुणाचा मृतदेह शहापूर खणीत फेकला (अद्याप उलगडा नाही), शुभम कुडाळकर (शहापूर), अलीम गदवाल (खोतवाडी), धनंजय नाईकवडे (इचलकरंजी), प्रणाली साळुंखे (निर्दयी बापाने केला खून), अफान मुल्ला (उपचाराला पैसे नसल्याने बापाने चिमुरडीला नदीत फेकले), हॉटेल व्यावसायिक संतोष ऊर्फ पप्पू जाधव, संदीप घट्टे (शहापूर).

कायदा-सुव्यवस्थेला आव्हान

वाढते नागरीकरण, औद्योगिकरणामुळे इचलकरंजीसह परिसराचा झपाट्याने विस्तार होऊ लागला आहे. कबनूर, शहापूर, तारदाळ, यड्राव, खोतवाडीत नागरी वस्त्या वाढू लागल्या आहेत. शहापूरही वाढत असताना संघटित टोळ्यांसह काळे धंदेवाल्यांचा विळखा धोकादायक ठरू लागला आहे. तीनपानी जुगार अड्डे, मटका, दारू, गुटखा तस्करीमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे.

शस्त्रांच्या धाकाने लुटमारी, चेन स्नॅचिंग, लुटमारी, आर्थिक वाद, पूर्ववैमनस्यासह अनैतिक कारणांतून गुन्हेगारीचा टक्का वाढल्याचेचित्र आहे. इचलकरंजीसह परिसरात घडणार्‍या गंभीर आणि जीवघेण्या घटना काळजाचा ठोका चुकविणार्‍या आहेत. संघटित टोळ्यांतील संघर्षातून भरचौकात, भरदिवसा मुडदे पडत आहेत. गर्दी, हाणामार्‍या नित्याच्या बनल्या आहेत. तलवारी, कोयता यांसारखी घातक शस्त्रे चौका-चौकांत तळपू लागली आहेत. नामचीन गुंडांच्या धुमश्चक्रीत गोरगरिबांची कोवळी पोरंही भरडली जाऊ लागली आहेत.

पोलिसांनाच गांभीर्य नाही

आठवड्यापूर्वी गुंडांनी संतोष जाधव यांच्यावर तलवारीने हल्ला करून अमानुष खून केला. मध्यवर्ती ठिकाणी थरार घडवून हल्लेखोरांनी दहशत माजवलेली असतानाच रविवारी मध्यरात्री संदीप शांताराम घट्टे याचा तारदाळ परिसरात खून झाला. आठवड्यात घडलेल्या दोन अमानुष घटनांमुळे शहर हादरले आहे. 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी दहशत माजवून आव्हान दिले असतानाही वाढत्या गंभीर घटनांचे पोलिसांना गांभीर्य नाही, असेच चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news