सांगोला : मालट्रक व ओमनी कारच्या धडकेत तीन ठार; नऊजण जखमी | पुढारी

सांगोला : मालट्रक व ओमनी कारच्या धडकेत तीन ठार; नऊजण जखमी

सांगोला ; पुढारी वृत्तसेवा : सांगोल्याजवळ मालट्रक व ओमनी कारच्या धडकेत तीनजण जागीच ठार, तर नऊजण गंभीर जखमी झाले. रविवारी (दि. 1 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास कारंडेवाडी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली.

मृतात ओमनी चालकासह दोन बालिकांचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (रा. उदनवाडी) कावेरी मनोज हरिजन (वय 7, रा. निरलांगी, ता. तलेकोटी जि. विजयपूर) गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय 8, रा. कोंडगोडी ता. जेवरगी जि. गुलबर्गा) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मृत दाजीराव शिंगाडे यांचा भाऊ माणिक शिंगाडे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, माझा भाऊ दाजीराम हा विष्णु रामचंद्र चौगले (रा. उदनवाडी, ता. सांगोला) यांच्या (एम. 12 एच. एफ. 9604) ओमनी गाडीवर चालक म्हणून काम करतो.

मालकाने रविवारी दाजीराम याला उदनवाडी (झापाचीवाडी) येथून पाच ते सहा लोकांना कर्नाटकातील सिंदगी येथे घेऊन जायचे असे सांगितले. त्याप्रमाणे तो तेथून सायंकाळी सातच्या सुमारास तीन पुरुष, तीन महिला, पाच लहान मुली व एक मुलगा अशा लोकांना घेऊन तो निघाला होता.

कारंडेवाडी फाट्याजवळ तो ओमनी घेऊन आला होता. त्यावेळी मिरजेहून सांगोल्याकडे निघालेल्या मालट्रकने (एम. एच. 13 सी. यु. 6086) मालट्रकने करांडेवाडी उड्डाण पुलाजवळ ओमनीला जोराची धडक दिली.

ही धडक एवढ्या जोरात होती की, ओमनी कारमधील दाजीराम शिंगाडे, कावेरी हरिजन व गुड्डी मगिरी हे तिघेजण गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. अपघाताची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी गेलो, त्यावेळी ट्रकचालक हा ट्रक सोडून पळून गेला होता. अपघातात ओमनी कारचा चेंदमेंदा झाला होता. घटनास्थळी मृतदेह व जखमी पडले होते.

सर्वांना रुग्णालयात दाखल केले. यामधील 9 जखमींची नावे समजू शकली नाहीत. माणिक शिंगाडे याच्या फिर्यादीनुसार अज्ञात मालट्रक चालकाविरुद्ध अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगोला पोलीस करत आहेत.

Back to top button