सोलापूर : पोलिस अधीक्षक कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

सोलापूर : पोलिस अधीक्षक कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापुरातील पोलिस अधीक्षक कार्यालयातच एका तरुणाने गुरुवारी (दि. 22) पेट्रोलची बाटली घेऊन आत्महत्येचा पवित्रा घेतला. प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीला माहेरच्यांनी मुलीला माहेरी नेल्याच्या नाराजीतून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने हे कृत्य केले. यावेळी पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला रोखल्याने अनर्थ टळला. ऋतुराज चंद्रकांत रणझुंजारे (रा. राऊत चाळ, दत्तनगर, बार्शी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याचे नाव आहे.

ऋतुराज रणझुंजारे याचे उस्मानाबाद येथील एका मुलीवर प्रेम होते. त्या दोघांचे सन 2014 ते 2021 पर्यंत प्रेमसंबंध होते. या कालावधीत त्या दोघांनी 29 सप्टेंबर 2019 रोजी पुणे येथील देवआळंदी येथे कायदेशीर पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2019 रोजी दोघे बार्शी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी आम्ही 10 दिवसांनी सहमतीने तुमचा विवाह करून देऊ, असे बार्शी शहर पोलिस ठाण्यात लिहून दिले. त्यानंतर ते मुलीस घेऊन उस्मानाबाद येथे गेले.

त्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांनी गेल्या दोन वर्षात लग्न लावून न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. या दोन वर्षात मुलीच्या आई-वडिलांनी व भावांनी ऋतुराजला खूप मानसिक त्रास दिल्याचा त्याचा आरोप आहे. त्यामुळे नैराश्यातून त्याने मी जीवनाचा शेवट करीत आहे. याला त्या मुलीच्या घरचे कारणीभूत आहेत. माझ्या मृत्यूला त्यांना कारणीभूत ठरवावे. असे मेसेस मध्ये टाईप करून ठेवले होते.

याच कारणामुळे ऋतुराज याने 14 जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही बार्शी पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, असा त्याचा आरोप आहे. यातूनच आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पेट्रोलची बाटली हातात घेवून तो सोलापुर पोलिस अधिक्षक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यावेळी तेथील पोलिसांनी त्याला अडविले. तसेच पोलिस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासमोर नेऊन चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.

ऋतुराजचे मत परिवर्तन केले…

पोलिस अधीक्षक कार्यालयात आज ऋतुराज रणझुंजारे हा पेट्रोलची बाटली घेऊन येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यासाठी आला होता. त्याची चौकशी करून आम्ही त्याचे मत परिवर्तन केले आहे. त्यामुळे ऋतुराज हा मनमोकळेपणाने बोलून गेला. त्याच्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.

Back to top button