उद्धव ठाकरे यांची प्रार्थना : कोरोना हटव, भक्तिसागर पुन्हा फुलू दे | पुढारी

उद्धव ठाकरे यांची प्रार्थना : कोरोना हटव, भक्तिसागर पुन्हा फुलू दे

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : जगभरात पसरलेले कोरोनाच्या महामारीचे संकट हटू दे. महाराष्ट्र सर्व संकटमुक्त होऊ दे. विठ्ठलाच्या पंढरीत पुन्हा एकदा भक्तिसागर फुलू दे. भक्तिरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरू होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलचरणी घातले.

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे 2.20 मिनिटांनी उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते व सौ. इंदुमती केशव कोलते, नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सदस्य संभाजी शिंदे उपस्थित होते.

यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आषाढी निमित्ताने पंढरपुरात फुलणारा वैष्णवांचा मेळा आणि चंद्रभागे तिरी फुलणारा जनसागर मात्र यावर्षीही दिसला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या दहा पालख्यांसमवेत आलेल्या 400 संत, वारकर्‍यांच्या उपस्थितीत महापूजा नगरप्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जीवनचक्रच विस्कळीत झाले आहे. महामारीने अनेकांचे बळी गेले आहेत. हे संकट विठ्ठलाच्या आशीर्वादाने हटावे.

पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटू दे, वारकर्‍यांनी तुडुंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेले पंढरपूर पहावयाचे आहे.

यावेळी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात संत कान्होपात्रा यांच्या स्मरणार्थ नव्याने तरटी वृक्षाचे रोपण करण्यात आले. हा परंपरेचा भक्तीवृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मानाचे वारकरी केशव शिवदास कोलते यांचा, तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई कोलते यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणार्‍या एक वर्षाचा मोफत पास उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी ठाकरे यांनी पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द केला. महापूजेनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.
गाहिनाथ औसेकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मंदिरात 5 टन फुलांची आरास

श्री विठ्ठल-रुक्मिणी
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त मंगळवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची केलेली आकर्षक आरास.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभार्‍यास, संपूर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी महाद्वार येथे फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. त्यासाठी 25 प्रकारची 5 टन फुले वापरण्यात आली. त्यामुळे मंदिर व संपूर्ण परिसराला मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते.

आषाढी यात्रेसाठी मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसर विद्युतरोषणाईने सजविला होता. झेंडू, जरबेरा, शेवंती, गुलछडी, अ‍ॅनथोरियम, ऑरकेड, गुलाब अशा विविध 20 ते 25 प्रकारच्या फुलांची रंगसंगतीचा वापर करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा,

श्रीसंत नामदेव महाराज स्मारक, व्ही. आय. पी. गेट या ठिकाणी आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. त्यासाठी करण्यासाठी साधारणतः 5 टन फुले आरासाकरीता वापरण्यात आली. फुलांची आरास पुणे येथील भाविक भारतशेठ भुजबळ यांनी केली.कोरोनामुळे भक्तांना देऊळबंद असले तरी मंदिरात व गाभार्‍यात करण्यात आलेल्याआरासचे मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून व सोशल माध्यमाव्दारे भाविकांना घर बसल्या दर्शन मिळत आहे.

Back to top button