साकिनाका आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | पुढारी

साकिनाका आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : साकिनाका परिसरात घडलेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येचा तपास 15 दिवसांत पूर्ण करून महिन्याभरात आरोपपत्र सादर केले जाईल. ही महिला विशिष्ट समाजाची असल्याने आरोपीवर आता अ‍ॅट्रोसिटीचे कलम लावण्यात आले आहे.

या महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 20 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून ही रक्कम तिच्या मुलींना टप्प्याटप्प्याने दिली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. पोलीस आयुक्तांनी सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन तपासासह काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.

पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने गुन्ह्यांची कबुली देताना त्या रात्री घडलेल्या संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. ही महिला आणि तो तिथे कधी आले, घटनास्थळी काय झाले होते. त्यानंतर त्याने काय काय घडले याची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली. या संपूर्ण घटनेचे नाट्यरुपांतर करून त्याचे व्हिडीओ शूटींग केले जाईल. पुरावा म्हणून ते शूटींग न्यायालयात सादर केले जाणार आहे. डीएनए रिपोर्ट लवकर मिळावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

पीडित महिला आणि आरोपी मोहन चौहाण हे एकमेकांच्या परिचित होते. यापूर्वीही त्यांची चार ते पाच वेळा भेट झाली होती. व्यवहारातून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. मात्र त्यांच्यात काय व्यवहार झाला आणि ती काय मागणी करीत होती हा तपासाचा भाग आहे, असे नगराळे म्हणाले. साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी साडेबारा वाजता भेट दिल्याची नोंद आहे. त्यामुळे पोलीस तिथे गस्त घालत नव्हते हे म्हणणे चुकीचे आहे, असे नगराळे यांनी सांगितले.

Back to top button