देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडू : उद्धव ठाकरे | पुढारी

देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडू : उद्धव ठाकरे

खेड, अनुज जोशी : ‘तुम्ही नाव चोरले. पण शिवसेना चोरू शकत नाही. आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू’, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शहरातील महाड नाका येथील गोळीबार मैदानात रविवारी झालेल्या शिवगर्जना जाहीर सभेत विरोधकांना दिला. ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर त्यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेस हजारोंची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, अ‍ॅड. अनिल परब, आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, सुषमा अंधारे, अमोल कीर्तीकर, केशवराव भोसले, सूर्यकांत दळवी, संजय कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन खा. विनायक राऊत यांनी केले.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, डोळ्यात मावत नाही, असे हे समोर आई जगदंबेचे रूप आहे. मला ते दिवस आठवत आहेत. मी शिवतीर्थावर माझ्या आईसोबत तुमच्यासारखा मातीमध्ये बसलो होतो. तुम्ही सगळी देव माणसे आहेत. ज्यांना आपण भरपूर दिले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आता काही नाही. तुमची साथ मला आहे. जे चोरटे आहेत ते शिवसेना नाव चोरू शकतात, शिवसैनिक नाही. आयोगाला सांगायचे आहे. हा चुना लाव आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाने नाही, माझ्या वडिलांनी केली आहे. ते शिवसेना तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. हे लोक निष्ठूर आणि निर्घृणपणे वागत आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. संजय कदम शिवसेनेत आलेत. ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही. तोफा देशद्रोह्यांविरुद्ध वापरायच्या. गद्दार लोकांनी आपल्या शिवसेना या आईवर वार केला आहे. जेव्हा हे नव्हते तेव्हा इथे किशोर कानडे होते.

आम्ही म्हणजे खरी शिवसेना, हा दर्प असेल तर तुम्ही हे नाव न वापरता लढून दाखवा. ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलेही नाही ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगणार असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांंनी डोळे वटारल्यावर शेपट्या घालून बसणे हे बाळासाहेब यांचे विचार नव्हे. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही फिरूनही सांभाळू शकत नाही. जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक झाले. कोव्हिड काळात मृतदेहांची विटंबना उत्तर प्रदेशमध्ये झाली, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात काही द्यायचे नाही आणि तुटलेल्या एसटीच्या काचांवर गतिमान महाराष्ट्र लावायला लाज वाटत नाही, असे त्यांनी सुनावले.

महाराष्ट्र माझे कुटुंब आहेच; पण ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलत आहात ते परवडणारे नाही. रेवस ते रेडी हा रस्ता चारपदरी आणि सिमेंटचा करण्याचा प्रयत्न केला, तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी देखील मी येऊन गेलो होतो. वीज वाहिन्या भूमिगत करण्यास सुरुवात केली.

मला सत्तेसाठी लाचार असल्याचे मोदी आणि शहा म्हणतायत. मग मेघालय देशातले सगळ्यात भ्रष्ट राज्य बनलंय, असा आरोप करून सत्तेसाठी तुम्ही संगमांच्या बाबतीत काय करीत आहात, असा सवाल ठाकरे यांनी या सभेत केला.

यावेळी ठाकरे पुढे म्हणाले की, कोकण शिवसेनेचे जीव की प्राण आहे. ज्या मैदानात शिवसेनाप्रमुख कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले, त्याच मैदानातून तुमचा आशीर्वाद घेऊन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात लढत आहेत. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्याशी, देश रक्षणाशी काही संबंध नाही, ते लोक सत्तेत बसले आहेत. त्यामुळे देशात स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

ज्यांनी धनुष्यबाण चोरलाय, त्या चोरांना तुम्ही मत देणार का? सत्तेचे गुलाम निवडणूक आयोग सांगतोय म्हणून मी घरी जाणार नाही. धनुष्यबाण घेऊन मैदानात याच चोरांनी मी मशाल घेऊन येतो, असे सांगत होऊनच जाऊ दे. जर आपण आज हे केलं नाही तर देशात हुकूमशाही सुरू होईल. काहींचा जन्म शिमग्यासाठीच झालाय. पण शिमग्यानंतर धुळवड होऊ द्या, मग बाहेर पडूया, असे आवाहनदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

Back to top button