Travel Tour : कोकण फिरताय? ‘या’ सुंदर बीचवर कधी गेलाय का? | पुढारी

Travel Tour : कोकण फिरताय? 'या' सुंदर बीचवर कधी गेलाय का?

स्वालिया शिकलगार – पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा आणि सुंदरबन त्याचबरोबर अथांग समुद्र आणि झुळझुळ वाहणारं समुद्री वारं, त्यात माशाचं कालवण म्हणजे क्या बात है! काय, आला ना डोळ्यांसमोर समुद्र. कोकणात तुम्ही अनेकदा गेला असाल किंवा एखादा बीच कदाचित बघायचा राहूनही गेला असेल. तारकर्ली, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, देवबाग, निवती, भोगवे (Travel Tour) याचबरोबर, गणपतीपुळे, आरेवारे यासारख्या ठिकाणी तुम्ही गेला असाल. ही ठिकाणे तशी वर्दळीची आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात एक सुंदर बीच आहे… ज्याला ‘महाराष्ट्राचं बटरफ्लाय बीच’ म्हटलं जातं. तो समुद्र आहे तरी कुठे, तेथे कसं जाता येईल, यासाठी ही खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही माहिती शेवटपर्यंत वाचा. (Travel Tour)

सुट्टीच्या दिवशी एखाद्या ट्रीपचा प्लॅन करायचा म्हटलं तर १० ठिकाणांची नावे डोळ‍्यासमोर येतात. मग घरातील मंडळींचं प्रत्येकाचं मत वेगळं. कुणाला कोकणात जायचं असत, तर कुणाला थंड हवेच्या ठिकाणी. मग सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी एक स्वच्छ आणि सुंदर, नितळ पाणी असलेल्या बीचवर तुम्हाला नक्कीच जायला आवडेल. रागवू नका हं…पण, कपलसाठी तर एकदम परफेक्ट असणारं हे बीच आहे.  😍❤️

या बीचचे नाव ‘कशेळी बीच’ किंवा ‘देवघळी बीच’ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असं आहे. कशे‍ळी हे रत्नागिरीच्या पश्चिमेकडे असणारे शेवटचं गाव आहे. या गावातूनच देवघळीचा रस्ता जातो.

काय काय पहाल? 

तीन दिवसाच्या ट्रीपमध्ये तुम्ही देवघळी-जाकादेवी मंदिर-पूर्णगड-कनकादित्य मंदिर-धुतपापेश्वर-पावस अशा ठिकाणांना भेट देता येईल.

देवघळी बीच-

कशेळी गावातून तुम्ही पोहोचल्यानंतर देवघळी बीचपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. टू-व्हिलर, फोर व्हिलर गाड्यादेखील बीचपर्यंत जाऊ शकतात. खरंतरं बीचच्या वरच्या बाजूस विस्तीर्ण पठार आहे. येथे तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता. येथे भूरळ पाडणारा नीरव शांतता असणारा समुद्र किनारा आहे. येथे पोहोचल्यानंतर येथील अथांग समुद्र डोळ्य़ांचे पारणे फेडणारा आहे. समुद्राच्या वरच्या बाजूस टेबल पॉईंट आहे. टेबल पॉईंटवरूनदेखील निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य बघता येते. या टेबल पॉईंटवरून खाली उतरून गेल्यानंतर छोटेखानी बीचवर जाता येते. पांढऱ्या रंगाच्या वाळूत जांभा खडकाने बनलेले अनेक दगड वाळूत रुतलेले दिसतात.

kankaditya temple

त्याचबरोबर या दगडांवर लाटा येऊन धडकताना काही शिंपले चिकटलेले दिसतात. याची सुंदर नक्षी बीचच्या सौंदर्यात भर टाकते. येथे एक घळी आहे. याच घळीतून कनकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचे स्थानिक सांगतात.

कनकादित्य मंदिर –

देवघळी बीचपासून काही अंतरावर कनकादित्य मंदिर आहे.  गावात दोन मंदिरे आहेत. एक कनकादित्य मंदिर आणि दुसरे जाकादेवी मंदिर. कानकादित्य मंदिरातील मूर्ती ही देवघळीच्या गुहेत सापडली होती, असे सांगण्यात येते. ज्या घळीत कनकादित्याची मूर्ती आढळली, ती घळ देवघळी नावाने ओळखली जाते. कनकादित्याचे मंदिर खूप सुंदर अशून ते पाहण्यासारखे आहे.

मंदिराच्या बांधकाम कोकणी शैलीचे आहे. लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून कोरीव रेखीव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. गाभागृहाच्या दोन्हीकडे द्वारपाल आहेत. गर्भगृहात कनकादित्याची मूर्ती असून मूर्तीच्या डोक्यावरील मुकूट हे दाक्षिणात्य पध्दतीचे आढळते.

जाकादेवी मंदिर –

कनकादित्य मंदिरापासून काही अंतरावर जाकादेवी मंदिर आहे. पूर्ण मंदिराचे बांधकाम जुने आणि पारंपरिक पध्दतीचे आहे. अशी फार कमी मंदिरे आहेत, जी अद्यापही मूळ स्थितीत टिकून आहेत.

देवघळीत राहताना- 

देवघळीत राहण्याची सोय नाही. पण तिथे टेंट भाड्याने मिळतात. तसेच ज्यांच्याकडून टेंट भाड्याने घेणार आहेत, तोच व्यक्ती तुम्हाला नाश्ता, चहा, जेवण बनवून देईल. तिथे मासे अथवा मटण, चिकन हवे असल्यास, सोबत जाताना घेऊन जायला लागेल. सोबत तुम्हाला पिण्यासाठी पाणीदेखील घेऊन जावे लागेल.

देवघळी किंवा कशेळीत कुठलेही मच्छी मार्केट नाही. त्यामुळे राजापुरातून जाताना सोबत घेऊन जावे लागेल.

देवघळीत राहायचं असेल तर रात्रीच्या वेळी पठारावर समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकत टेंटमध्ये झोपणे, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल. येथील ग्रामपंचायतीचे टॉयलेट, बाथरूमचा वापर करता येतो. जर फक्त बीचला भेट देऊन परत यायचं असेल तर एका दिवसात देवघळी बीच बघता येतो.

कसे जाल देवघळीला-

कोल्हापूर-शाहूवाडी-मलकापूर -आंबा-साखरपा-पुनास-पावस-पूर्णगड-कशेळी-देवघळी बीच

कोल्हापूर- पोर्ले तर्फ ठाणे-वाघवे-नांदारी-करंजफेण-अनुस्कुरा घाट-पाचाळ-सौंडाळ-धुतपापेश्वर-आडिवरे-कशेळी-देवघळी बीच

कोल्हापूर-बालिंगे-असळज-खारेपाटण-राजापूर-खालची भंडारवाडी-आडिवरे-कशेळी-देवघळी बीच 

कोल्हापूरपासून जायचे असल्यास तुम्ही वरील तिन्हीपैकी एक मार्ग निवडू शकता.

Back to top button