सच्चे शिवसैनिक असाल तर मतदारसंघात या : संदीप सावंत | पुढारी

सच्चे शिवसैनिक असाल तर मतदारसंघात या : संदीप सावंत

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
निधी मिळत नाही म्हणून सुरत व गुहावटी येथे जाण्याची गरज काय? त्यापेक्षा येथे आंदोलन करून नाराजी व्यक्त केली असती तरी विश्वास जपला असतात. बंडखोरी करून जर खरोखरच सच्चे शिवसैनिक असाल, तर मतदारसंघात परत या. दबाव, जबरदस्ती असेल तर कळवा, शिवसेनेचे मावळे आग्राहून सुटकेप्रमाणे तुमची सुटका करण्यास सज्ज आहेत, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी येथे केले.

या विषयी सावंत म्हणाले की, राज्यातील राजकीय अस्थिरता व धोक्यात असलेला पक्ष या परिस्थितीमुळे आपल्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे. तेव्हा तालुकाप्रमुख म्हणून नव्हे तर एक शिवसैनिक म्हणून मत मांडत आहे. कोकणचे नेते दीपक केसरकर व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासारखे शिवसैनिक बंडखोरी करतात तेव्हा ते मनालाही खरं वाटत नाही. केसरकर यांना पक्षाने खूप काही दिले, काही कमी केले नाही. त्यांच्या प्रत्येक अडचणीच्यावेळी पक्षाने साथ दिली. परंतु, आता तेच बंडखोर आमदारांची पाठराखण करीत आहेत.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक सहकार्‍यांनी बंडखोरी करून पक्षाला अडचणीत आणले आहे. विकासकामांना निधी मिळण्यात अन्याय होत होता तर त्यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कैफियत मांडायला पाहिजे होत किंवा राजीनाम्याचे शस्त्र वापरायला हवे होते. परंतु, त्या उलट बंडखोरी करून पक्षासह शिवसैनिकांची नाराजी ओढवली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक बंडखोर आमदाराने मतदारसंघातील शिवसैनिकांचे मत जाणून परत यावे. त्यांचे स्वागत केले जाईल. तुम्हाला मंत्रिपदे मिळतील. केंद्राची सुरक्षा मिळेल. परंतु, ती कामी येणार नाही. आमदारांच्या पुढे आणि मागे गाडी ही शिवसैनिकांच्या जिवावर आहे. बंडखोरी केल्याने मतदारसंघातील मतदारांची सुरक्षा कोण बाळगणार, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला.

Back to top button