आचरा; पुढारी वृत्तसेवा : श्रावण येथे हिरव्या रंगाच्या सापडलेल्या दुर्मीळ जातीच्या चापड्या सापाला पकडून चिंदर येथील सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.
मालवण तालुक्यातील श्रावण गावात सोमवारी रविकांत महाजनी यांच्या घराशेजारी एक हिरव्या रंगाचा साप आढळल्याने प्राणीमित्र स्वप्निल गोसावी यांना बोलवण्यात आले होते. तेव्हा तो चापड्या जातीचा विषारी साप असल्याचे निष्पन्न झाले. हा साप साधारण 2 फूट लांब होता. हा साप महाजनी यांच्या विहिरीजवळील पंप शेडमध्ये एक दिवस होता. एक दिवस होऊनही साप तेथून न गेल्याने महाजन यांनी प्राणी मित्र गोसावी यांना बोलावले. गोसावी यांनी या सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. याप्रसंगी डॉ. श्रीकृष्ण मगदूम यांनी मदत केली.
या सापाबद्दल माहिती देताना स्वप्निल गोसावी यांनी सांगितले की, हा साप प्रामुख्याने दाट झाडे असणार्या प्रदेशात राहतो. हा साप निशाचर असून शक्यतो झाडी झुडपांवर बसलेला आढळतो. बेडूक, सरडे, उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. त्याला इंग्रजीत इराले Pit Viper असे म्हणतात. तर मराठीत चापड्या किंवा हिरवा घोणस असे म्हणतात. हा साप फुरश्यांच्या कुळातील असला तरी याचे विष घोणस व फुरसे यांच्या विषाप्रमाणे तीव्र नसते. याचा दंश झाल्यास माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता फार कमी असते. ही प्रजाती सिंधुदुर्गात प्रामुख्याने सहयाद्री पट्ट्यात आढळते, तर इतरत्र फार दुर्मीळ असल्याचे त्यांनी सांगितले.