सिंधुदुर्ग : आंबेली येथे बोलेरो उलटली ; गाडीतील सर्व कोंबड्या मृत्युमुखी | पुढारी

सिंधुदुर्ग : आंबेली येथे बोलेरो उलटली ; गाडीतील सर्व कोंबड्या मृत्युमुखी

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
चंदगड ते गोव्याच्या दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणार्‍या बोलेरो पिक-अप गाडीला आंबेली येथील अवघड वळणावर अपघात झाला. अपघातात गाडी उलटल्याने गाडीतील सर्व कोंबड्या मृत झाल्या. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने गाडीतील चालक व वाहक सुखरूप बचावले. अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला.

सध्या तिलारी ते वीजघर हा मार्ग दुरुस्त झाल्याने वाहने भरधाव वेगाने चालवून अपघात घडण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी पहाटे असाच कोंबडी वाहतूक करणार्‍या गाडीला अपघात झाला. गोव्याला कोंबडी वाहतूक करणारी बोलेरो पिक-अप गाडी चंदगड येथून निघाली. रविवारी पहाटेच्या सुमारास आंबेली-कोनाळकरवाडी येथील उतारावरील वळणावर आली असता गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर धडकली व पलटी झाली. या अपघातात गाडीतील सर्व कोंबड्या जागीच ठार झाल्या.

मात्र, गाडीतील चालक व क्लिनर सुदैवाने बचावले. मृत झालेल्या कोंबड्यांचा ढीग पडला होता. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गाडीची विद्युत खांबाला जोरात धडक बसताच विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे तेथील वीज गायब झाली. अपघाताची बातमी परिसरात पसरताच स्थानिकांची गर्दी केली. तसेच दोडामार्ग पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी मदत कार्य करत गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याचे यावेळी चालकाने सांगितले.

राज्यमार्ग तरीदेखील दर्शक फलक नाहीत

दोडामार्ग तालुक्यातील राज्य मार्गावरून वाहने चालविण्याच्या दृष्टीने वाहनचालकांसाठी कोणतेही सूचक अथवा दर्शक फलक लावले गेले नाहीत. त्यामुळे रस्त्याचा अंदाजही वाहनचालकांना येत नाही. शिवाय काही वाहने भरधाव वेगात असल्याने वळणांचा अंदाजही येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सूचक अथवा दर्शकफलक लावावेत. तसेच वाहतूक विभागानेसुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ राजाराम गवस यांनी केली.

Back to top button