सयाजीराव गायकवाड : प्रज्ञावंत साहित्यिक

सयाजीराव गायकवाड : प्रज्ञावंत साहित्यिक
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र मगर

महाराष्ट्र शासनाच्या सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने 13 व्या खंडातील 50 ग्रंथांचे प्रकाशन नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होत आहे. त्यानिमित्ताने…

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा केल्या. त्यांनी केलेल्या सुधारणांमुळे बडोदा राज्य ओळखले जाते. प्रजेच्या उत्थानासाठी आयुष्यभर परिश्रम करणे हेच त्यांनी जीवनाचे अंतिम ध्येय मानले. आपल्या कार्यकर्तृत्वाने हिंदुस्थानातील समकालीन सर्व संस्थानांत पुढारलेले बडोदा संस्थान निर्माण केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक गुणांचा भरणा होता. या गुणांत आणखी एका गुणांची भर टाकता येईल. तो गुण म्हणजे ते लिपीचा, भाषेचा, कलेचा, साहित्याचा, साहित्यिकांचा, प्रकाशकांचा विचार करणारे प्रज्ञावंत साहित्यिक आणि साहित्यप्रेमी राजा होते.

त्यांनी देशातील नव्हे, तर परदेशातील साहित्यावर स्वतःच्या चिंतनाने भाष्य केले. साहित्यनिर्मितीसाठी आर्थिक मदत केली. तसेच स्वतःही नानाविध विषयांवर लेखन केले. त्यांचे लेखन प्रामुख्याने वैचारिक असले तरी त्यामध्ये प्रजेच्या सुधारणेचा ध्यास होता. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्याव्यासंगाचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या विचारात, लेखनात आणि चिंतनातही अनेक दिवसांची तपश्चर्या होती. त्यांचे साहित्य म्हणजे त्यांनी कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानाचा परिपाक आणि अभ्यासाचे फलित होते.

त्यांच्या विद्याव्यासंगाची, साहित्यप्रेमाची आणि त्यांच्या साहित्याची माहिती कमी प्रमाणात आहे. त्याचबरोबर बडोदा संस्थानातील ग्रंथालय चळवळ, देशी भाषांना त्यांनी दिलेले अभय, प्राच्यविद्या प्रसारासाठी दिलेले पाठबळ, परदेशी साहित्याचे देशी भाषेत भाषांतर करण्यासाठी केलेली मदत, संस्थानातील ग्रंथनिर्मिती, त्यांचे साहित्य आणि त्यांचा साहित्यविषयक विचार याची माहिती अत्यल्प प्रमाणात आहे.

हाच धागा पकडून महाराष्ट्र शासनाच्या 'महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती'ने 'सयाजीराव महाराजांचे लेखन' 13 व्या खंडात प्रकाशित केले आहे. सयाजीराव महाराजांच्या जीवन चरित्रावरील एकूण 25 खंडांतून 62 ग्रंथांचे समितीने लेखन प्रकाशित करताना महाराजांच्या या दुर्लक्षित पैलूला उजेडात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

महाराजांच्या जीवन चरित्रावरील बारा खंडांचे प्रकाशन बडोदा येथील साहित्य संमेलनात झाले. आता त्यापुढील तेरा खंडांतील 50 ग्रंथांचे प्रकाशन नाशिक येथील साहित्य संमेलनात होत आहे. बडोदा ही महाराजांची कर्मभूमी, तर नाशिक ही महाराजांची जन्मभूमी. या दोन्ही ठिकाणी महाराजांचे साहित्य प्रकाशित व्हावे, हा एक योगायोगच म्हणावा लागेल.

तेराव्या खंडात महाराजांनी लिहिलेले एकूण पाच मौल्यवान ग्रंथ समाविष्ट आहेत. मुळातच सयाजीराव महाराजांचे सर्व प्रकारचे लेखन हे वैचारिक आणि ऐतिहासिक आहे. यामुळे या लेखनाला संशोधकीय शिस्त आहे. 'फ्रॉम सीजर टू सुलतान' हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी महाराजांनी रोमच्या इतिहासाविषयीचे अनेक ग्रंथ वाचले होते. त्याबाबत त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रांतून उल्लेख आले आहेत. त्यांचा सर्वांत आवडता इतिहासकार गिबन होता. त्यामुळे साहजिकच गिबनने लिहिलेले अनेक ग्रंथ त्यांच्या वाचनात आले.

गिबनने लिहिलेला 'Decline and Fall of the Roman Empire' हा आठ खंडातील ग्रंथही वाचनात आला. त्यावर आधारित 'फ्रॉम सीजर टू सुलतान' हा ग्रंथ लिहिला. महाराजांनी लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. परंतु, त्यांनी ज्या विषयावर हा ग्रंथ लिहिला, त्याविषयाची परिपूर्ण माहिती ग्रंथलेखनाच्या अगोदर घेतली.

रोमच्या इतिहासाचा त्यांनी सर्वंकष अभ्यास केला. प्रत्येक सत्ताधीशांच्या काळातील चांगल्या-वाईट बाबींचे सखोल अवलोकन केलेले दिसते. रोमच्या प्रत्येक कैसरने राज्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला; परंतु अनेक वर्षे ही सत्ता एकाकडून दुसर्‍याकडे जात होती. बाहेरून जरी ही सत्ता मोठी आणि अजिंक्य वाटत असली तरी, इ.स. 244 च्या आसपास आतून त्यास कीड लागली होती. महाराजांचे याबाबतचे निरीक्षण वस्तुनिष्ठ आहे. बडोदा राज्यात इ.स. 1898-1899 मध्ये मोठा दुष्काळ पडला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या सर्व प्रांतांचा त्यांनी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी केलेल्या मदतीच्या विभागानुसार नोंदी घेतल्या.

या नोंदी ग्रंथरूपाने 'NOTES ON THE FAMINE TOUR BY HIS HIGHNESS THE MAHARAJA GAEKWAR' म्हणून इ.स. 1901 मध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या दुर्मीळ ग्रंथात तत्कालीन दुष्काळ निवारणासाठी केलेल्या नोंदी आहेत. त्यांनी भविष्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी या नोंदींचा उपयोग केला. आगामी संकट निवारणासाठी दिशादर्शक राजमार्ग तयार झाला म्हणून या ग्रंथाचे महत्त्व कालातीत आहे. या मूळ ग्रंथाचे पुनर्प्रकाशन करून मराठी आणि हिंदी अनुवादही समितीने प्रकाशित केला आहे.

महाराजांनी दुष्काळातील नोंदी सूक्ष्मपणे घेतल्या. त्यांच्या नजरेतून लहान-लहान बाबी सुटल्या नाहीत. त्याबाबतची अनेक उदाहरणे ग्रंथात दिसतात. महाराजांचा हा ग्रंथ फक्त एक नोंदींच्या स्वरूपात नाही, तर त्यामध्ये लालित्यपूर्णताही आहे. त्यांनी घेतलेल्या एका नोंदीवरून त्यांच्यातील लेखक आणि प्रज्ञावंत साहित्यिकही समजतो. महाराजांचा हा ग्रंथ मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणार्‍यांना आजही मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारख्या दिशादर्शक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news