

सातारा; विशाल गुजर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला त्यांच्या हयातीतच दैवत्व प्राप्त झाले होते. अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाच्या स्वदस्तूरचा कागद (चंदनात बुडविलेला हाताचा ठसा, अर्थात हस्तमुद्रा) सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आहे. मात्र, दिग्गज इतिहास संशोधक, ज्येष्ठ इतिहासकार स्व. ग. ह. खरे यांनी याबाबत संदिग्धता व्यक्त केल्याने ती हस्तमुद्रा आजही संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. या हस्तमुद्रेचा संग्रहालयापर्यंतचा प्रवासही थक्क करणारा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा आणि उजव्या पायाचा चुन्यामधील ठसा सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही आहे. त्या व्यतिरिक्त महाराजांची त्यांच्या हयातीत आणि महानिर्वाणानंतरची अनेक मंदिरेही आहेत. मोडी लिपीतील त्यांची स्वाक्षरीही अनेक पत्रांवर आहे. मात्र, त्यांचा स्वतःच्या हाताचा कागदावरील ठसा मात्र अजूनही अस्सल पुराव्यानिशी उजेडात आलेला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातील म्हसवडच्या राजेमाने घराण्यातील एका व्यक्तीला त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा चंदनात बुडवलेल्या हाताचा ठसा असल्याचा एक कागद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तो कागद ज्येष्ठ इतिहास संशोधक व इतिहास अभ्यासक ग. ह. खरे यांच्याकडे अधिक संशोधनासाठी पाठवून दिला असल्याचे त्यांनी खरे यांच्याकडे पाठविलेले पाकीट पाहिल्यानंतर समजते. सन 1941 साली हे पाकीट राणंद (ता. माण) येथून पोस्टात टाकले गेले. ते दहिवडी पोस्ट ऑफिस येथून सातारा पोस्ट ऑफिस आणि त्यानंतर ग. ह. खरे यांच्याकडे गेल्याचे त्यावरील शिक्क्यांवरून समजते. या पाकिटासोबत आणखी काही कागदपत्रे असण्याची शक्यता आहे. मात्र, हा ठसा असलेल्या कागदासोबत ग. ह. खरे यांनी ही हस्तमुद्रा तपासली असा मजकूर हाताने लिहिला असल्याने याला पुष्टी मिळते.
आजही हस्तमुद्रा असलेला हा कागद पाहिल्यानंतर तो शिवकाळात तयार करण्यात आला असावा, असे वाटते. या हस्तमुद्रेच्या वरच्या बाजूला 'श्री महादेव' अशी मोडी लिपीतील अक्षरे असून, यातील 'श्री' हे अक्षर कागद जीर्ण झाल्याने गायब झाले आहे. मुळात अशा हस्तमुद्रेसोबत अभयपत्र (अधिकृत मान्यता असलेले पत्र) असते आणि त्या व्यक्तीला अभय आहे याची शाश्वती म्हणून पत्र पाठविणार्याचा चंदनात बुडविलेला हाताचा ठसा उमटविण्याची पद्धत त्या काळी होती. त्यावरून या हस्तमुद्रेसोबत एक अभयपत्र निश्चित असणार आहे. ते पत्र जोपर्यंत उजेडात येत नाही, तोपर्यंत ही हस्तमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची आहे असे म्हणता येत नाही. कदाचित ग. ह. खरे यांनीही यामुळेच संदिग्धता व्यक्त केली असावी.
म्हसवडच्या राजेमाने घराण्यातील शिवकालीन प्रमुख व्यक्तीला जर छत्रपती शिवरायांनी काही कारणास्तव अभय दिले असेल तर तसे पत्र नक्की त्यांच्याकडील जुन्या मोडी लिपीतील कागदपत्रांमध्ये सापडू शकते. यावर इतिहास अभ्यासक व संशोधकांकडून अधिक संशोधन होण्याची गरज आहे. भविष्यात सुदैवाने असे पत्र उजेडात आल्यास हस्तमुद्रेचा हा अमूल्य ठेवा सातार्याच्या संग्रहालयातील सर्वात मौल्यवान दागिना ठरणार आहे.
ज्या पाकिटातून हा मौल्यवान कागद राणंद (ता. माण) च्या पोस्टाच्या पेटीत टाकला गेला त्यावर दि. 23 एप्रिल 1941 असा शिक्का आहे. त्यानंतर म्हसवड व सातारा अशा दोन्ही पोस्ट ऑफिसचे शिक्के आहेत. या पाकिटावर एक आणा किमतीचे पोस्टाचे तिकीटही चिटकवलेले आहे. ते आजही खूप चांगल्या स्थितीत आहे. 1941 साली पोस्टाच्या पेटीत टाकलेले हे पाकीट व त्यावरील तिकीट आज छत्रपती शिवाजी संग्रहालयात आहे. राणंद येथून 1941 साली बाहेर पडलेले हे पाकीट आणि त्यातील हस्तमुद्रा सातार्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयाला दि. 31 मार्च 1969 रोजी मिळाल्याची नोंद आहे. संग्रहालयाच्या रजिस्टरमध्ये 637 नंबरवर बी. वाय. राजेमाने, म्हसवड देणगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची असू शकणारी हस्तमुद्रा व हस्ताक्षर अशी नोंद आहे.