विक्रमादित्य प्रशांत दामले

विक्रमादित्य प्रशांत दामले
Published on
Updated on

नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असते याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमध्ये राहिली पाहिजे, असे त्यांचे वागणे असते. सर्व कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने…

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. 1983 मध्ये सुरू झाली. त्यांची ही कारकीर्द आता 12 हजार 500 नाट्यप्रयोग होईपर्यंत सातत्याने सुरू आहे. त्यांची ही विक्रमी कारकीर्द अभिनेत्यांना प्रेरणादायी आहे. 'टुरटूर' या मराठी नाटकापासून दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 37 उत्तमोत्तम चित्रपटांत आणि 26 नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी 24 मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.

प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. आम्ही दोघं राजा राणी, एका लग्नाची गोष्ट, ओळख ना पाळख, कार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री तेजश्री प्रधान), गेला माधव कुणीकडे, चल काहीतरीच काय, चार दिवस प्रेमाचे (1026 प्रयोग), जादू तेरी नजर, टुरटूर, नकळत दिसले सारे, पाहुणा, प्रियतमा, प्रीतिसंगम, बहुरूपी, ब्रह्मचारी, बे दुणे पाच, माझिया भाऊजींना रीत कळेना, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, लेकुरे उदंड झाली, व्यक्ती आणि वल्ली, शू कुठं बोलायचं नाही, श्री तशी सौ, संशयकल्लोळ (सहअभिनेता राहुल देशपांडे), साखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री शुभांगी गोखले), सासू माझी ढासू, सुंदर मी होणार अशी प्रदीर्घ नाटकांची प्रशांत दामले यांची कारकीर्द. याशिवाय जवळपास 25 मराठी सिनेमांतून प्रशांत दामले यांनी आपली अभिनयाची कारकीर्द सादर केली आहे.

5 एप्रिल 1961 चा त्यांचा जन्म. म्हणजे आता ते एकसष्ठ वयाचे आहेत. म्हणजे केवळ 39 वर्षांत त्यांनी इतकी सर्व कामगिरी करून दाखवली आहे. सदा हसतमुख असणार्‍या या कलाकाराबद्दल जितके बोलावे तेवढेे थोडे आहे. माझा त्यांचा संबंध साखर खाल्लेला माणूस या नाटकामुळे आला. मी लिहिलेल्या या नाटकाचे त्यांनी जगभर प्रयोग केले. ते स्वत: नाट्य निर्माते आहेत. माझा त्यांच्याबाबतचा वैयक्तिक अनुभव असा की, बरेच निर्माते आपली या निर्मितीत पैशाची गुंतवणूक आहे म्हणून आपल्याला हवे तसे नाट्य संहितेत बदल करून घेतात. पण प्रशांत दामले यांनी 'लेखक आणि दिग्दर्शक' जे म्हणतील तेच मी अभिनेता म्हणून स्टेजवर सादर करणार, अशी स्वच्छ भूमिका घेतली.

नाटक काय किंवा सिनेमा काय, हे एक टीमवर्क असते याची प्रशांत दामले यांना पूर्ण कल्पना असते.त्यामुळे आपली टीम नेहमी नाटकाच्या मूडमध्ये राहिली पाहिजे, असे त्यांचे वागणे असते. सर्व कलाकारांना योग्य तो सन्मान, योग्य त्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत, असा त्यांचा अट्टहास असतो. हल्लीची पिढी नाटकाचा उपयोग सिनेमात, सीरियलमध्ये आपल्याला काम मिळावे म्हणून करत असतात आणि भरकटत जातात.

मी नाटकही करतो, सिनेमात जमलं तर काम करतो, जाहिरातीत काम मिळालं तर बघतो, असे म्हणत एक ना धड भाराभर चिंध्या, असे करतात आणि अपयशाची पायरी नव्हे तर जिना चढत राहतात. याबाबतीत त्यांनी प्रशांत दामले यांच्याकडून एक धडा घ्यायला हवा की, आपण अभिनय करणार आहोत आणि त्यात आपल्याला प्रथम प्रावीण्य मिळवले पाहिजे. आपल्या अभिनयाला दाद प्रेक्षकांची मिळाली पाहिजे. म्हणून कामात सातत्य हवे. कामातले सातत्य हेच इतिहास घडवत असते. गेली कित्येक वर्षे किंबहुना नाट्य निर्माता झाल्यानंतर त्यांनी सिनेमा वगैरे करणे पूर्ण सोडून दिले होते. याही वयात ते ज्या उत्साहाने काम करतात, त्यावरून ते मराठी नाटकातले देव आनंद आहेत, असे म्हटले पाहिजे. त्यांची अभिनय कारकीर्द सर्व नवोदित अभिनेत्यांसाठी स्फूर्तिदायक आहे. नाटकातील आणि चित्रपटातील सहजाभिनय हा प्रेक्षकाला सहजपणे भावतो.

विद्यासागर अध्यापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news