

सचिन परब गणपती या शब्दाचा आपल्या आजच्या भाषेत अनुवाद करायचा, तर तो 'लोकनेता' असाच करावा लागेल. फक्त शब्द नाहीत, तर गणपती बाप्पाचे रूपही नेत्यांना आदर्श असेच आहे. कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्येही आपला बाप्पा 'लीडरशिप क्वालिटी'च्या मखरात आदर्श म्हणून शोभून दिसतो. अर्थात, त्यासाठी आपण फक्त आपल्या या लाडक्या विश्वविनायकाकडे डोळे उघडे ठेवून बघायला मात्र हवे. येत्या बुधवारी (31 ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने…
निवडणुका जवळ आल्या की, लोकशाहीचे नगारे वाजू लागतात. पुन्हा प्रश्न उभा राहतो, 'देश का नेता कैसा हो?' प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचे उत्तर देतो. त्यावरून वाद, चर्चा झडतात. त्याचे उत्तर मात्र सापडत नाही. पण भारतीय परंपरेने या प्रश्नाचे उत्तर देऊन ठेवलेय. ते उत्तर आहे, 'गणपती बाप्पा जैसा हो!' आश्चर्य वाटेल, पण आपला गणपती बाप्पा हे आदर्श नेत्याचे प्रतीक आहे. फक्त राजकारणातच नाही, तर आधुनिक कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्येही 'लीडरशिप'च्या फंड्यांतही तो आदर्श ठरतो.
देवधर्म मानणारे श्रद्धेने डोळ्यांबरोबर डोकेही मिटून घेतात. देवधर्म नाकारणारे तेच तिरस्काराने करतात. दोन्हीमुळे वाटोळे होतेच. डोळे आणि डोके उघडे ठेवून देवाकडे, धर्माकडे बघायला हवे. धर्मात डोके वापरा असे सगळे संत, सुधारक वर्षानुवर्षं सांगताहेत. त्यांचे ऐकून निदान बुद्धीची देवता गणरायांचे रूप तरी समजून घ्यायला हवे. कसलाही धार्मिक विधी असो, सर्वात आधी बुद्धीची देवता म्हणून गणपतीची पूजा करावीच लागते. योग्य-अयोग्याचा निर्णय घेते, ती बुद्धी. पूजा निर्बुद्धपणे करू नका. पोट भरण्यासाठी बुद्धी वापरता, मग जगणं शिकवणार्या गोष्टीत ती का नको, असेच गणराज आपल्याला अग्रपूजेत सांगत असतो. कुणीतरी सांगतेय म्हणून आपण काही करू नये. प्रश्न विचारणे, उत्तरे शोधणे हीच बुद्धीच्या देवाची खरी पूजा आहे. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥' हा संत तुकोबारायांनी सांगितलेला विचार त्या पूजेचा बीजमंत्र आहे.
हे सांगणारी एक कथा पुराणातही आहे. गणपती यज्ञात अडथळे आणत होते. ऋषीमुनींनी वैतागून देवाधिदेव महादेवाकडे तक्रार केली. महादेवांनी उपाय सुचवला, गणपतीची पूजा करा. जणू काही गणपतींना इगोप्रॉब्लेम झाला होता, अशा प्रकारे आपण कथेचा अर्थ घेतो. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे माणूस जोडणे. कुणी यज्ञाला फक्त कर्मकांडात आणि स्वर्गाच्या कामनेत अडकून ठेवत असेल, तर बुद्धीची देवता त्याला त्रास देणारच. यज्ञात सगळ्यात महत्त्वाचे आहे ते जमिनीवरच्या लोकांशी मैत्री करणे, त्यांना उभे करणे. ऋषीमुनींनी गणपतीची ही अग्रपूजा सुरू केली आणि गणपती प्रसन्न झाले!
गणपतीच्या कथांमधला अर्थ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे एक आधुनिक भाष्यकार पांडुरंगशास्त्री आठवले आपल्या 'संस्कृती पूजन' पुस्तकात म्हणतात, 'पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचं शीर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला शीर शोधून आणण्यासाठी पाठवलं. पार्षद जवळच जाऊन हत्तीचं मस्तक घेऊन येतो आणि धडावर ते मस्तक ठेवून गणपतीला सजीव केलं जातं. गणपती गजानन बनतो.
पुराणांची भाषा भावगर्भीत अशीच लक्षणा आणि रुपकं यांनी भरलेली असते. बुद्धिशाली माणसाने स्वत:ची बुद्धी कसाला लावून भावगर्भीत अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो. तर भगवान शंकराच्या हाताने हत्तीचं मस्तक धडावर बसवलं जातं. मग गणेशाचं स्वत:चंच मस्तक पुन्हा का जोडलं नाही? परंतु, पुराणं आपल्याला समजावतात की, गणपती हा तत्त्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्त्ववेत्ता आणि नेता याच्याजवळ हत्तीचंच मस्तक असलं पाहिजे.' गणेशाच्या रूपात नेत्याचे कोणते गुण आहेत, हेही त्यांनी सांगितलं आहे.
गणपतीच्या नावातच नेतृत्व आहे. 'गण' म्हणजे 'लोकांचा समूह' आणि 'पती' म्हणजे 'नेता.' 'गणपती' शब्दाचा शब्दश: अर्थ 'लोकनेता.' 'गणराज', 'गणराय', 'विनायक', 'विश्वनायक' या नावांतही नेतृत्व आहेच! गणपती हा 'गुणपती'ही आहे. आदर्श नेत्याचे गुण कोणते ते 'गणपती' सांगतो. हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. नेता हा बुद्धिमानच असायला हवा, हे गजमुख आपल्याला सांगत असते. ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटलने 'फिलॉसॉफर किंग'ची संकल्पना मांडलीय.
फिलॉसॉफर जगण्याचा बारकाईने विचार करतो. जगायचे कशासाठी ते त्याला स्पष्ट माहीत असते. त्यामुळे तो स्वार्थाच्या पलीकडे पाहू शकतो. आपल्याकडली 'राजर्षी' ही संकल्पना अशीच आहे. सत्तेत राहूनही ऋषीपेक्षा विरक्त असणारे राजा जनक हे त्याचे उदाहरण मानले जातात. आधुनिक काळात याच अर्थाने 'राजर्षी' म्हणून शाहू महाराजांचा गौरव होतो. रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांचे 'श्रीमंत योगी' असे केलेले वर्णनही याची आठवण करून देणारे आहे. खरे 'फिलॉसॉफर किंग' एकच, 'शिवछत्रपती!'
नेता कसा असायला हवा? गणपतीसारखा 'शूर्पकर्ण.' त्याचे कान हवेत सुपासारखे. सूप साल टाकून देते आणि चांगले धान्य स्वत:कडे ठेवते. नेत्याला सगळ्यांचेच सतत ऐकावे लागते. त्याने त्यातले सत्त्व तेवढेच घ्यावे. तो हलक्या कानाचा असून कसे चालेल? बाप्पा 'लंबोदर'ही आहे. त्याचे पोट मोठे आहे. लोकांचे अपराध पोटात घेण्यासाठी आणि विश्वासाने सांगितलेले पोटात ठेवण्यासाठी! माफी हे वीराचे लक्षण आहे. दीर्घद्वेष असणारा चांगला नेता बनू शकत नाही.
बाप्पांचे डोळे बारीक आहेत. हे प्रतीक सूक्ष्म आणि दीर्घद़ृष्टीचे. सूक्ष्मद़ृष्टी दोष दाखवते. नेत्याने दोषांना दूर ठेवावे. दीर्घद़ृष्टी म्हणजे भविष्य पाहणारी नजर. लोकांच्या दीर्घकालीन भल्याचा विचार त्याला करावा लागतो. तो 'वक्रतुंड'ही आहे. रिद्धी म्हणजे संपत्ती आणि सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती. त्या दोघींपासून या वक्रतुंडाने तोंड फिरवले आहे. म्हणूनच त्या त्याच्याजवळ आहेत. सुखाच्या मागे लागणार्यांना कधीच सुख मिळत नाही. आव्हानांच्या दिशेने तोंड असणार्याकडे सगळे येते. अशांना वाकडेपणा आवडत नाही. पारदर्शक मोकळेपणा हे उत्तम नेत्याचे लक्षण आहे. वाकड्यात जाणार्याला धडा शिकवणारा तो 'वक्रतुंड.' त्याचा एक दात पूर्ण आहे आणि दुसरा अर्धा. त्यातला एक दात श्रद्धेचा आहे आणि दुसरा बुद्धीचा. दोन्ही गोष्टी पूर्ण नाहीत. कधी श्रद्धा अपुरी असते, कधी बुद्धी.
गणपतीला चार हात आहेत. नेत्याला दोन हात पुरत नाहीत. त्यांना अनेक हात हवे असतात. ते हात कार्यकर्त्यांचे असतात. गणपतीचे हात कार्यकर्त्यांना कसे सांभाळावे, ते सांगतात. एका हातात अंकुश, दुसर्या हातात पाश, तिसर्यात मोदक आणि चौथ्याने आशीर्वाद. नेत्याने कार्यकर्त्यांकडून काम करून घ्यावे, पण त्याला भरभरून द्यावेदेखील. तेव्हाच कार्यकर्ता टिकतो. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर अंकुश ठेवून तिला विध्वंसाकडून विधायकतेकडे नेण्याची जबाबदारी नेत्याची असते. त्यासाठी कधी पाशाने शिक्षा करावी लागते, तर कधी मोकळ्या हाताने आशीर्वाद द्यावे लागतात. ही कसरत करताना मदतीला असतो, तो मोदक. मोद म्हणजे आनंद. तो तत्त्वज्ञानातून मिळतो. कुणी ते वरवर चाखला तर त्याला तो फिका लागतो. मात्र, थोडी आत बुडी मारली तर गोडच गोड! ज्ञान नेत्याजवळ हवे आणि कार्यकर्त्याजवळही. दोघांमध्ये विचारांच्या चर्चा सतत झडायला हव्यात. त्यातूनच उभा राहतो विचारांवर निष्ठा असलेला कार्यकर्ता.
बाप्पाचे पाय मात्र तोकडे आहेत. नेत्याने उगाच सगळीकडे धावाधाव करणे योग्य नाही. प्रत्येक ठिकाणी त्यानेच डोके घालू नये. त्याने इतरांकडून कामे करून घ्यावीत. त्यांच्या पायांना दिशा द्यावी. छोटे पाय हे अंमलबजावणीचे प्रतीक आहे. मोठमोठे परिवर्तनाचे आराखडे तयार करणे ही आपली प्राचीन खोड आहे. पण ते सगळे प्लॅनिंग कागदावरच राहत आलेय. त्या महान आराखड्यांची अंमलबजावणी आपल्या इतिहासात क्वचितच झाली. कारण, आपल्याकडे योजना करणारे थोर आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे हीन, अशी वर्णभेदांची उतरंडच शतकानुशतके आहे. ती मानसिकता संपवा, असे बाप्पाचे पाय सांगत असतात. कामे व्हायची असतील तर बुद्धीएवढाच श्रमाचाही गौरव हवा.
लाल हा क्रांतीचा रंग. नेत्याला क्रांती हवी असते. विधायक बदलांना विरोध करतो तो नेता नाही, हे खुशाल समजावे. हा क्रांतीचा लाल रंग बाप्पाने घेतला आहे मंगळाकडून. मंगळ हा पृथ्वीचा पुत्र. गणपती हा पार्वतीचा म्हणजे पृथ्वीचाच मुलगा. म्हणूनच गणेशभक्तीत मंगळवार आणि अंगारिकेचे महत्त्व आहे. अंगारक हे मंगळाचेच नाव. क्रांतीही पृथ्वीशी म्हणजे मातीशी जोडली असली पाहिजे. फक्त राजे बदलणे म्हणजे क्रांती नाही. लोकांच्या जगण्यात बदल घडवते ती क्रांती. चंद्र आणि मन हे आपल्या परंपरेत जवळपास समानार्थीच शब्द आहेत. उपवास म्हणजे संयम राखताना चंद्राकडे म्हणजे मनाच्या चंचलतेकडे ढुंकून बघायची गरज नाही. उपवास सोडताना मात्र मनाला त्याचा मान द्यावा. चतुर्थीचे सांगणे हेच आहे.
गणपती हा आई पार्वतीचा लाडका लेक. त्याचीही आईवरती प्रचंड माया आहे. कथेनुसार, पार्वतीनेही स्वत: एकटीने त्याची निर्मिती केलीय. त्याच्या निर्मितीत शिवशंकराचा सहभाग नाही. उलट त्यांनी सुरुवातीला गणेशाला मारलेच आहे. पार्वती मातृसत्ताक पद्धतीचे प्रतीक आहे. मातृसत्ता ही प्रेम आणि आदराच्या आधारे उभी असलेली लोकशाही समाजपद्धत होती. त्यातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे गणपती. पुरुषसत्ताक पद्धत ही हिंसा आणि भीतीच्या आधारावरची राजेशाही पद्धत आहे. 'मातृसत्ताक ते पुरुषसत्ताक' या स्थित्यंतरात आईची बाजू घेऊन लढणारा 'गणपती'च होता. म्हणूनच गपणतीच्या पूजेबरोबर गौरीपूजाही आहेच. एका अवतारात तर त्याने महिलांचे सैन्यदेखील उभे केलेय. महिलांच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही नेतृत्व टिकू शकत नाही, हे तो सांगतोय.
गणपती हा व्यासरचित 'महाभारता'चा लेखनिकही आहे. त्याचबरोबर अकराव्या शतकातले तमिळ संतकवी 'नांबियंदर नांबी' यांची गाथाही गणपतींनीच लिहिलीय. चांगल्या समाजासाठी उत्तम साहित्यही घडवावे लागते. पण त्याहीपुढे जाऊन केलेले हे डॉक्युमेंटेशन आहे. आपला भूतकाळ कसा होता, हे वर्तमानपुढे मांडणे आणि वर्तमानाला भविष्यासाठी टिपून ठेवणे हे नेत्याचे कामे आहे.
गणपती हा 'ओमकार' आहे. ओमकार हा सगुणाकडून निर्गुणाकडे होणारा प्रवास आहे. मूर्ताकडून अमूर्ताच्या दिशेने होणारी ही वाटचाल आहे. भक्तीत मूर्ती लागते; पण फक्त मूर्तीत अडकून बसता कामा नये. विसर्जनामागचा अर्थ तोच आहे. खरा देव गाठायचा असेल, तर मूर्तीचे विसर्जन करावेच लागेल. हा साधनेतील अटळ असा संघर्ष आहे, असे अध्यात्म मानते. मोठ्या नेत्यांच्या प्रतिमा पूजनाचे विसर्जनही असेच अपेक्षित असते. व्यक्तिपूजेत क्रांती संपून जाते. म्हणून व्यक्तीच्या प्रतिमेपेक्षा त्याचा विचार मोठा, हे समजून घ्यायला हवे. नेत्याला देव करणे सोपे असते; पण त्यांचे माणूसपणच इतरांना माणूस म्हणून उभे करण्यासाठी प्रेरणा देते.
विसर्जन हे अंत नाही. हे विशेष सर्जन आहे. नवनिर्मिती आहे. एकातून अनेक नेते उभे राहायलाच हवेत. आमच्या चितेतून हजारो भगतसिंग उभे राहतील, असे सांगणार्या शहिदांची प्रेरणा विसर्जनात असली पाहिजे. मशालीने मशाली पेटल्या पाहिजेत. क्रांतीची ज्योत कधीच विझता कामा नये. 'गणपती बाप्पा मोरया!'
सचिन परब