

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : ज्या मायभूमीन आपल कुटुंब, घरदार, पिकं, जमीन सारं काही गिळंकृत केलं, त्या मायभूमीत पुन्हा मोकळ्या हातांनी कोणासाठी आणि कशासाठी रहायचं? वर्षभरानंतरही त्या काळ्याकुट्ट आठवणी पाठ सोडत नाहीत. जड पावलांनी नव्या उमेदीने भलेही पुन्हा मायभूमीची वाट धरली तरी घरादारावर कायमच आपत्तीची टांगती तलवार आहे. जीव मुठीत धरून जगण्यापेक्षा दुसरीकडे सुरक्षित पुनर्वसन करा, गाडलेल्यांवर अंत्यसंस्कार केले, निदान एक वर्षानंतर तरी वाचलेल्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा' असा टाहो भुस्खलन व महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटंबांचा आहे. शासनकर्त्यांच्या हृदयाला कधी पाझर फुटणार हाच खरा प्रश्न आहे.
'मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशा कविता सांगायला, ऐकायलाचांगल्या वाटत असल्या तरी आपत्तीत ज्यांच घर उद्ध्वस्त झालं त्यांच्या वेदनांना अंत नाही. पाटण तालुक्यात भूस्खलन झालेल्या आंबेघर, मिरगाव, ढोकावळे आदी अनेक गावांची अशीच अवस्था आहे. मूळच्या गावात आपलं असं काहीच उरलं नाही. जन्मभर पै न पै साठवून, पोटाला चिमटा देत काडी-काडी गोळा करून उभा केलेला संसार पुन्हा त्याच उमेदीने उभा करण्याची वेळ शेकडो कुटुंबावर आली.
एका रात्रीतच निसर्गानं गावं, घरांसह सर्वस्वाचा नकाशाचं बदलून टाकला. हे सारं पुन्हा उभ करायचं आव्हान स्वीकारून भलेही नव्या उमेदीने सर्व काही उभं केलं तरी पुन्हा निसर्गाकडून ते कधी मातीतं गाडलं जाईल याची शाश्वती नाही. नव्या उमेदीने,जीवाच्या आकांताने संसार उभारायचां आणि त्याच वास्तूत गाडले जाण्याच्या भीतीनं जीव मुठीत घेऊन जगायचं. उभी पीकं, शेतजमीनही वाहून गेल्यानं कुठं आणि काय पिकवायचं? भुकेचा डोंब उसळल्यावर आपल्यासह पोराबाळांच्या पोटाची खळगी कशानं भरायची? पर्यटनातून किमान रोजगार, व्यवसायातून किमान उदरनिर्वाह सुरू असायचा तोही निसर्गानं हिसकावून नेला आहे.
मदतीचा धावा देवाकडे की प्रशासनाकडे.. ?
कोणत्याही वाईट प्रसंगात देवाकडे आपणं आपला जीव आणि सर्वकाही वाचविण्यासाठी धावा करत असतो. गतवर्षीच्या भूप्रलयात कित्येकांचे संसार पोरबाळं,घरादारासह मातीत गाडले गेले. संबंधितांचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे धावा करायचा तर तो देवही देव्हार्यासहीत मातीत गाडले गेले. त्यामुळे आता जे काही उरलेत त्यांच्या सार्वत्रिक पुनर्वसनासाठी माणसातला देव तथा शासन, प्रशासनातला संवेदनशील माणूस मनापासून जागा झाला तरचं काहीतरी घडेल. अन्यथा मग देवा तुझ्याच नव्हे तर शासन व प्रशासनच्या गाभार्यालाही उंबराच नाही हे सिद्ध होईल.