

पप्पा, पप्पा!
येस जॉनी!
उद्या शाळेत येणार ना?
नो जॉनी!
टीचरने बोलावलंय तुम्हाला.
पण, उद्या पोटात दुखणार आहे, म्हणून नो जॉनी.
मागच्या आठवड्यात गुडघ्यात मुरडा आलाय, असं काही तरी म्हणाला होतात. मध्येच पायातलं ब्लडप्रेशर वाढलंय म्हणून शाळेत यायचं टाळता.
येस जॉनी. पण, तुझ्या शाळेत यायला मी जाम टरकतो जॉनी. पुढच्या आठवड्यात बघू.
गुड पप्पा असं करत नसतात पप्पा!
आई ग, मेंदूला झिणझिण्या येताहेत रे!
चला, डॉक्टरकडे नेऊन 'टुचुक' करून आणतो. मी शाळेत जायला टाळाटाळ केली की, असंच बोलायचात.
नको रे, इंजेक्शनला तर कधीपासून जामच भ्यायचो मी; पण आता वाटतंय, ते तरी एकाच टोचणीत संपतं. तुमच्या शाळा त्यापेक्षा डेंजर आहेत.
मी आहे ना? माझं बोट धरून या आणि शाळा सांगेल तेवढे पैसे भरा.
शाळेत पालकांनी यायचं ते फक्त पैसे भरायलाच का रे? किती ते पैसे? माझं पदवीपर्यंतचं शिक्षण जेवढ्या पैशात झालं तेवढे तुझ्या चौथी इयत्तेपर्यंतच संपले की रे!
आता महागाई वाढल्यावर तसंच होणार ना!
कबूल. तिकडे शाळाखातं मारे 15 टक्के शुल्क कपात करायला सांगतंय; पण शाळा अर्क निघाल्यावर ते तरी काय करणार?
एवढं काय केलं माझ्या शालामाऊलीने?
तुझी खरी माऊली बरी म्हणावं इतकं मला लुटले! प्रयोगशाळा शुल्क, वाचनालय शुल्क, क्रीडांगण शुल्क असं एकेक अॅड होतंय फीमध्ये. शाळेची लायब्ररी कुठे आहे रे?
काय माहिती.
आणि प्रयोगशाळेत शेवटचा पाय कधी टाकलास?
असेल दोन-तीन वर्षांपूर्वी. तरी याच्या फिया मी भरायच्या? पटांगणावर गुडघाभर गवत माजलंय, तरी शुल्क भरायचंच का?
ही सगळी आर्ग्युमेंटस् शाळेला सांगायला तरी तिथवर धडकायला हवं ना पप्पाश्री!
आणि तिथे कोणी धक्काबुक्की केली, हुसकवले तर? आता तर पगारी बाऊन्सर्स ठेवलेले असतात म्हणे!
डोंट वरी पप्पा! शाळेतले बाऊन्सर्स कमी केलेत. तसा वरून आदेश आला होता म्हणे!
नशीबच म्हणायचं पालकांचं. सगळेच पालक काही पैलवान नसणार, नाही का?
शिवाय आता प्रत्येक शाळेत सी.सी.टी.व्ही. पण बसवलेत. ते नेहमी चालू ठेवायची सक्तीपण आहे.
आणखी काय असेल बरं तिथे माझ्या सुरक्षेसाठी?
तक्रार पेट्यापण ठेवल्यात बरं का प्रत्येक शाळेत. तुम्ही सुमडीमध्ये तक्रार करायची ना कोणाबाबतही?
सोन्याजॉन्या, कोणाकोणाविरुद्ध तक्रार करू सांग बरं! शाळा लुटताहेत, मनमानी करताहेत, दहशत माजवताहेत. वर प्रश्न विचारणार्या पालकांची बोलती बंद करताहेत. शाळा या मुलांच्या आनंदाइतकीच पालकांचा विश्वास कमवण्याची हमी देण्यासाठी असतात, हे विसरले का सगळे?
आय डोंट नो पप्पा! पण, मला एक नक्की माहितीये, उद्या तुम्ही माझ्या शाळेत यायचं म्हणजे यायचंच.
आलो असतो रे जॉनी; पण उद्या माझी कंबर धरणार, त्याला काय करायचं? आई गं…!
– झटका