पत्नीला लग्नात भेट म्हणून दिले गाढवाचे पिल्लू!

पत्नीला लग्नात भेट म्हणून दिले गाढवाचे पिल्लू!
Published on
Updated on

इस्लामाबाद : एखाद्याला मूर्खात काढायचे असेल तर आपण सहजपणे त्याला 'गाढव' म्हणत असतो. मात्र, या मेहनती व स्वामीनिष्ठ प्राण्याचा हा अपमान आहे हे आपण विसरतो. प्राण्यांचा अभ्यास असणार्‍या व पशुप्रेमी लोकांकडून मात्र अशी चूक होत नाही. अशाच एका पाकिस्तानी युवकाने आपल्या लग्नात पत्नीला गाढवाचे एक गोजिरवाणे पिल्लू भेट म्हणून दिले. त्यावेळी त्याने प्राण्यांविषयी आणि विशेषतः गाढवांविषयीची उपयुक्त माहितीही उपस्थितांना दिली. त्याच्या पत्नीनेही या भेटीचा सहर्ष स्वीकार केला आणि दोघांनी या गाढवाला गोंजारत कॅमेर्‍यासमोर पोज दिल्या.

या माणसाचे नाव आहे अजलान शाह. त्याच्या 'शरीक-ए-हयात' म्हणजेच जीवनसंगीनी असलेल्या पत्नीचे नाव आहे वरीशा. अजलान एक प्रसिद्ध यू ट्यूबरही आहे. त्याने आपल्या पत्नीला जी भेट दिली ती महागड्या अंगठीची किंवा अन्य दागिन्याची नव्हती. त्याने हे बेबी डंकी म्हणजेच गाढवाचे पिल्लू पत्नीला भेट म्हणून दिले. अर्थात या पिल्लाची त्याने आईशी ताटातूट केलेली नव्हती. त्याच्या आईबरोबरच या पिल्लाला विवाहस्थळी आणले होते. हे पिल्लू आपल्या आईसमवेतच या नवपरिणित दाम्पत्याच्या घरी राहणार आहे. अजलानचे अनेक शॉर्ट व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झालेले आहेत. नुकताच त्याने वरीशा जावेद हिच्याशी निकाह केला. त्यानंतर 'दावत-ए-वलीमा' म्हणजे लग्नाची मेजवानी झाली. या वेडिंग रिसेप्शनमध्ये अजलानने हे पिल्लू पत्नीला भेट म्हणून दिले. ते त्याने धोबीघाटावर जाऊन तीस हजार रुपयांमध्ये खरेदी केले होते. अजलानप्रमाणेच वरीशाही पशुप्रेमी आहे. तिला गाढवं आवडतात हे तिने यापूर्वी अजलानला सांगितले होते.

विशेष म्हणजे अजलानच्या आईलाही हा मेहनती प्राणी आवडतो. अजलानने सांगितले, हे आमचे जणू दत्तक घेतलेले मुल आहे. बेगम त्याचे नाव 'माफिन' ठेवू इच्छिते आणि मला त्याचे नाव 'गुड्डू' ठेवण्याची इच्छा आहे. नाव थोडे 'देसी' पाहिजेच. सध्या त्याचे नाव काय ठेवायचे यावरून काथ्याकूट सुरू आहे. (एकंदरीत दोघांचा संसार सुरू झाला!) हे पिल्लू त्याच्या आईसमवेत आमच्या फार्महाऊसवर आरामात राहील. अजलान आणि वरीशाच्या लग्नात पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news