पंढरपूर : आषाढी वारी झाली; स्वच्छतेची बारी आली

पंढरपूर स्वच्छता मोहिम
पंढरपूर स्वच्छता मोहिम
Published on
Updated on

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  आषाढी यात्रा सोहळा दोन वर्षार्ंनंतर प्रथमच निर्बंधमुक्त साजरा झाला. या सोहळ्यास 15 लाखांवर भाविकांनी हरिनामाचा जयघोष करीत भर पावसात उपस्थिती लावली. आषाढी एकादशी साजरी करून भाविक परतीच्या प्रवासाला निघाले. भाविकांमुळे पंढरीत तयार झालेला कचरा उचलण्याचे काम नगरपालिका आरोग्य विभागाकडून सुरू आहे. याकरिता 1350 कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. दररोज 125 टन कचरा उचलण्यात येत असून भाविकांची संख्या जसजशी कमी होईल तसतशी पंढरीनगरी स्वच्छ केली जात आहे.

आषाढी यात्रा कालावधीत दशमी, एकादशी व द्वादशीला पंढरपूर शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता राहावी म्हणून स्वच्छतेचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यात आला आहे. नगरपरिषदेच्यावतीने कामयस्वरुपी 325, तर ठेकेदारीवर 1025 अशा 1350 सफाई कर्मचार्‍यांद्वारे शहरात व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे.

आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर येथील कचरा उचलण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक मोठ्या मठामध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवण्यात आले आहेत. हे बॅरेल ओव्हरफ्लो झाल्याचेही दिसत आहे. भाविकांची गर्दी असलेल्या मठातील कचरा गर्दी कमी झाल्यास किंवा रात्रीच्या वेळी उचलण्यात येत होता. नगरपालिकेच्या कायमस्वरुपी 43 घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.

पंढरपूर शहरामध्ये कचरा त्वरित उचलण्यासाठी 2 टॅ्रक्टर, 2 कंटेनर कॅरिअर,2 जेसीबी, 2 टिप्पर, 125 कंटेनरमार्फत दररोज 125 टन कचरा उचलण्यात येत आहे. उचलण्यात आलेला कचरा कासेगाव हद्दीतील डंपिंग ग्राऊंड येथे एकत्रित केला जात असल्याचे आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे व आरोग्य निरीक्षक तोडकर यांनी सांगितले.

यात्रेपूर्वी संपूर्ण वाळवंट दोनवेळा स्वच्छ करण्यात आलेले आहे, तर दशमी, एकादशी व द्वादशीला ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. भाविकांनी उघड्यावर शौचास बसू नये म्हणून विशेष टीम नेमण्यात आली आहे. यामुळेही अस्वच्छता दिसून आली नाही. तसेच बायोकल्चर तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात होणारी घाण, दुर्गंधीयुक्त वास, कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे.

चंद्रभागा नदीपात्रात स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागेची पूजा करताना निर्माल्य, द्रोण, पत्रावळ्या, अन्न टाकलेेले आहे. निर्माल्य व फाटके कपडे, चपला यांचे ढीग नदीपात्रात तयार करण्यात आले. हा कचरा आरोग्य विभागाकडून डंपर, टिप्परच्या सहाय्याने बाहेर काढला जात आहे. मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्याने कामात अडथळे येत असले तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करून दोन दिवसांत 'स्वच्छ पंढरी, सुंदर पंढरी' करण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

 निर्बंधमुक्त आषाढी यात्रा साजरी झाल्याने गर्दी होती. गर्दीचा भाग वगळता मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग, स्टेशन रोड या ठिकाणी एकादशीदिवशी देखील स्वच्छता मोहीम आवश्यकतेप्रमाणे राबवण्यात येत आहे, तर गर्दी कमी झालेल्या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेल्या कचराकुंड्या रिकाम्या केल्या जात आहेत. दररोज 125 टन कचरा उचलण्यात येत आहे.
– शरद वाघमारे
आरोग्य निरीक्षक, न.प.पंढरपूर 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news