

बहुआयामी प्रतिभा शक्तीचे लेणे ईश्वरी कृपेचा प्रसाद की स्वकमाई? या प्रश्नाचे उत्तर कठीण असले तरी समकालीन सांस्कृतिक इतिहासाला आपल्या विशिष्ट व विशेष भूमिकेने प्रभावित करण्याचे भाग्य मोजक्या लेखकालाच प्राप्त होते. त्यातच द. मा. मिरासदार यांचे कर्तृत्व अधोरेखित करणे क्रमप्राप्त आहे. सुमारे 18 चित्रपटांच्या कथा-पटकथा किंवा संवादाची पुण्याई प्रदान करणारी मिरासदारांची लेखणी शेकडो कथांच्या निर्मितीत रमली. हजारो-लाखो रसिकांच्या मनात या कथेतील विनोदांनी हसर्या लाटा निर्माण केल्या. सुखाच्या संवेदनेत न्हाऊन निघणारी मराठी रसिकता द. मा. मिरासदारांच्या 'मिरासदारी'ने समृद्ध केली.
दत्ताराम मारुती मिरासदार अकलूज-पंढरपूर असा प्रवास करून पुण्यनगरीमध्ये विसावले. काही वेळ पत्रकारिता व शिक्षकी पेशा स्वीकारून मिरासदार शेवटी 1961 मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि द. मा. मिरासदार या त्रिमूर्तींनी कथाकथन हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचविला.
मिरासदारांची कथाकथने त्यांच्या वयाच्या उत्तरार्धातही चालूच होती. त्यांची विनोदी भाषणेही गाजलेली आहेत. अमेरिकेसारख्या साम्राज्यशाहीच्या देशात मिरासदारांच्या कथाकथनाचे अनेक कार्यक्रम झाले. हा बहुमान तसा दुर्मीळच!
गप्पा गोष्टी, गुदगुल्या चकाट्या, चुटक्यांच्या गोष्टी, बेडेबाया, फुकट, मिरासदारी हे प्रतिनिधिक कथासंग्रह त्यांच्या शीर्षकावरूनच चटकदार साहित्याचा प्रत्यय देतात. भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, हुबेहूब या विनोदी साहित्यकृतींनी मराठी रसिकांना उदंड हसवले. दमांचा विनोद बोचरा व ओरबाडणारा नसून गालातल्या गालात हसवणारा आहे. ग्रामीण जीवनातील इरसाल व बिलंदर व्यक्ती व नमुने त्यांनी प्रतिभेच्या बळावर साहित्यात जिवंत केले. त्यात गणा मास्तर, रमा खरात, बाबू पैलवान, नाना चेंगट अशा अनेक इरसाल व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत.
'ठकास महाठक' आणि 'एक डाव भुताचा' या चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली. बालसाहित्यही लिहिले. यासंदर्भात 'अंगत पंगत' आणि 'गप्पांगण' हे लेखसंग्रह बहुचर्चित आहेत, तर 'जावई बापूंच्या गोष्टी' हे बालकांना आवडणारे लेखन प्रसिद्ध आहे.
द. मा. मिरासदार पुण्यात झालेल्या 83 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात त्यांनी त्यांची 'भुताची गोष्ट' रसिकांना ऐकवून हसविल्याची आठवण आजही ताजी आहे. गावरान भाषा व गावरान व्यक्ती नमुने हे त्यांच्या कथेचे सामर्थ्य आहेे. मराठी माती व संस्कृती मिरासदारांनी त्यांच्या साहित्यात सन्माननीय केली.
द. मा. मिरासदारांच्या कारकिर्दीवर विनोदी लेखक म्हणून ठसा उमटला असला तरी काही कथांमध्ये त्यांच्या गंभीर प्रवृत्ती व प्रकृतीच्या साक्षी जरूर मिळतात. त्यात 'विरंगुळा' ही कथा महत्त्वाची ठरते. त्याचप्रमाणे 'कोणे एके काळी' आणि 'स्पर्श' या कथांची नोंदसुद्धा याच संदर्भाने अटळ ठरते.
साहित्य अकादमीसह अनेक सन्मान मिळवणारे मिरासदार मराठी विनोदाच्या साम्राज्याचे सम्राट बनून राहिले. कोल्हटकर-गडकरी- अत्रे-पुलंच्या वारशात त्यांचे विनोदी लेखन फुलले. मिरासदारांची व्यक्ती नमुन्यांची गॅलरी सर्वगुणसंपन्न वैभवाने नटलेली आहे. माणसाच्या बेरकीपणाचे त्यांचे आकलन व अभिव्यक्तीकरण कमालीचे गौरवास्पद आहे. त्यांच्या रगेल व रंगेल व्यक्ती नमुन्याचा गावरानी मेवा अनुभवताना वाचक हसतो आणि समृद्धही होतो. 'सुताराची आनशी' ही एकच स्त्री व्यक्तिरेखा जरी अभ्यासली तरी खुद्द मिरासदारांच्याच बेरकीपणाची मिरासदारी सर्वार्थाने अनमोल ठरते. वाल्मीकी पुरस्कारासह शिवाजीराव भोसले आणि विंदांच्या नावाचा गौरव पुरस्कार प्राप्त करून मिरासदारांनी स्वतःचा वेगळा ठसा साहित्यविश्वात उमटवला.
वेदनेच्या किंवा वेदनामुक्तीच्या साहित्याची श्रेष्ठता प्रमाण मानणार्या वाङ्मयीन विश्वात विनोदाचे चांदणे शिंपून रसिकमनाला रिझवणारे- आनंद देणारी मिरासदारी नव्या संदर्भांनी समजून घ्यावी लागेल. दुःख अटळच. वेदनेची अपरिहार्यता मान्यच! पण म्हणून तर जीवन सुसह्य करण्यासाठी माणसाजवळ कोणते उपाय आहेत? विनोदी लेखनाचे मूल्य या संबंधाने निर्णायक आहे. आणि विनोदाची मिरासदारी म्हणूनच वंदनीय ठरते.