

नागज (सांगली); पुढारी वृत्तसेवा : आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने ते बिरोबा देवदर्शनासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, बिरोबा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा व मध्यप्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मी मुख्यमंत्री असताना बिरोबा देवस्थानसाठी पाच कोटी रुपये दिले. आणखी काही कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. मंदिराच्या विकासासाठी देवस्थानकडे 165 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करूच; परंतु केंद्राच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधी मिळवून देऊ. त्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. सर्वांचं चांगभलं करण्याचे साकडे बिरोबा देवाकडे घातले असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बिरोबा देवस्थान ट्रस्टतर्फे घोंगडं, काठी आणि फेटा देऊन फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडेे, आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, संगीता खोत, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, मिलिंद कोरे, ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक यावेळी उपस्थित होते.
एस.टी.कर्मचार्यांचे चांगभलं करण्याची इच्छा सरकारला जागृत होवो ः फडणवीस
एस.टी.कर्मचार्यांचे चांगभलं करण्याची इच्छा महाविकास आघाडी सरकारला होऊ दे. त्यांचे चांगभलं होवो, असे साकडे बिरोबा चरणी घातले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरेवाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी, असे साकडे बिरोबाकडे घातले काय, असे पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिरोबाला सर्व माहिती आहे. त्यांच्या मंदिरातून स्वत:करिता मागण्याऐवजी समाजाकरिता, सगळ्यांकरिता मागितलं पाहिजे. चांगभलं म्हंटले की सर्व आलेच, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. एस.टी.कर्मचार्यांचे चांगभलं करण्याची इच्छा सरकारला होवो, असे साकडे घातले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.