ठाकरे-पवारांना मध्यावधीचे वेध

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
Published on
Updated on

निवडणुकांसाठी सज्ज राहा! उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची चिन्हे असून, त्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. गुजरातमध्ये निवडणुका असल्याने महाराष्ट्रातील प्रकल्प त्या राज्यात पळविण्यात आले. आता महाराष्ट्रात लाखो कोटींची गुंतवणूक आणणार असल्याचे गाजरदाखविले जात आहे. गुंतवणूक आणतो, रोजगार देतो, असे
सत्ताधार्‍यांकडून वारंवार सांगितले जात आहे. भरीस भर म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा निकालही त्यांच्या बाजूने लागेल, असे चित्र दिसत नाही. विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार असल्याचीच ही चिन्हे आहेत, असे उद्धव म्हणाले.

विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार मोठे प्रकल्प त्या राज्यात पळविले. त्यानंतर आता, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक आणणार असल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार, नोकर्‍या देऊ, असेही आश्वासन ते देत आहेत. मध्यावधी निवडणुका उरकून टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असा अंदाज उद्धव यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्तासंघर्षावरून निर्माण झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत. घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. सर्वच न्यायप्रविष्ट बाबींचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल, असे सध्या तरी चित्र नाही. ही टांगती तलवार आहे. सगळे सुरळीत होईल, आपल्या मनासारखे होईल, या भ्रमाचा भोपळा आता फुटू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवडणुकांची तयारी चालविली असल्याचेही ठाकरे म्हणाले.

परिवर्तनासाठी सज्ज व्हा! शरद पवारांचे आवाहन

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत आहे. राज्यातील सध्याच्या एकंदर राजकीय हालचाली विचारात घेता, परिवर्तन घडविण्याची संधी आपल्याला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले.

शिर्डीतील राज्यव्यापी 'मंथन, वेध भविष्याचा कार्यकर्ता मेळाव्या'च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, फौजिया खान, धनंजय मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासह खासदार, आमदार उपस्थित होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे शरद पवार यांनी पूर्ण भाषण केले नाही. ते मोजकेच बोलले आणि त्यांचे लिखित विचार दिलीप वळसे-पाटील यांनी वाचून दाखवले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, केंद्रीय निवडणूक आयोग, एनआयए, एनसीबी या यंत्रणांच्या गैरवापराची देशात चर्चा सुरू आहे. देशाचे नेतृत्व चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशा घटकांनी सत्तेचा हव्यास सोडून देशाचा विचार करणे आवश्यक आहे; परंतु तसे न होता अनेक राज्यांतील नेतृत्वांवर अनैतिक हल्ला केला जातो. राज्यातील सत्ता कायम राखणे व नवीन सत्तास्थान बळकावणे हाच काय तो त्यांचा अजेंडा असल्याची टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रापुरता विचार करावयाचा झाल्यास राज्यकर्ते कुठे आहेत, काय करतात? काहीच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला. 'फॉक्सकॉन'नंतर 'टाटा-एअरबस'सारखा प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आला. सध्याच्या सरकारच्या डोळ्यांदेखत हे प्रकल्प गेले, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. टाटा-एअरबसचा हवाई प्रकल्प हलविण्यापेक्षा देशाच्या संरक्षणाच्या द़ृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प कार्यक्षम कसे करता येतील, याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. कमजोर होत चाललेल्या अर्थव्यवस्थेकडे व महागाईसारख्या प्रश्नांची सोडवून करण्याकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव राज्यातील सरकारमध्ये आलबेल नाही. 106 जणांच्या सहाय्याने आलेले हे सरकार केवळ 40 जणांसाठी राबत आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात मांडण्यात आला. तो सरकारकडे पाठविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, शिबिरात बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गुजरातने फॉक्सकॉन प्रकल्प पळवून नेला आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पॉपकॉर्न आले, असे ते म्हणाले. ईडीच्या चौकशीत कधीही भाजपच्या लोकांची नावे येत नाहीत. भाजपमध्ये गेले की, त्याच्या मागील तपास यंत्रणांचा फेरा थांबतो. भाजप म्हणजे लॉन्ड्री मशिन आहे, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news