

न्यूयॉर्क : चॉकलेट बार खाणे आवडत नाही असे म्हणणे म्हणजे उगाचच प्रौढपणा मिरवल्यासारखे आहे. खरे तर आबालवृद्ध अशा सर्वांनाच चॉकलेटची आवड असते. आता तर डार्क चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंटस् व त्याचे हृदय वगैरेसाठी असलेले आरोग्यदायी उपयोग पाहता अनेक लोक चॉकलेटचे सेवन करू लागले आहेत. काहींना चॉकलेटबारपेक्षा हॉट चॉकलेट पिणेही आवडते. सध्या आपल्या जिभेला तृप्त करणार्या आणि आरोग्यासाठीही गुणकारी ठरणार्या चॉकलेटची निर्मिती कधी झाली हे माहिती आहे का? चॉकलेटचे मूळ कुठे आहे हे जाणून घेणे अनेकांना आवडेल.
नेमक्या कुठल्या माणसाने चॉकलेटचे सेवन सर्वप्रथम सुरू केले हे आता काळाच्या ओघात गडप झालेले गुपित आहे. मात्र, सर्वप्रथम दक्षिण अमेरिकेत चॉकलेटचे सेवन सुरू झाले याचे पुरावे आढळतात. तिथे 'थिओब्राेमा कॅकेओ' हे वृक्ष आढळतात. 5300 वर्षांपूर्वी या झाडाच्या फळांमधील बिया वाळवून, आंबवून त्याचा वापर खाण्यासाठी केला जात होता.
आग्नेय इक्वेडोरमधील सांता अॅना-ला फ्लोरिडाच्या पुरातत्त्वस्थळी त्याचे सर्वात आधीचे पुरावे सापडलेले आहेत. हे ठिकाण मायो-चिंचिपे संस्कृतीशी निगडीत आहे. याबाबतची माहिती 'नेचर इकॉलॉजी अँड इव्हॉल्युशन' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र, या वृक्षाची संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील लोकांना त्यापूर्वीच माहिती असावी व त्याचा वापरही केला जात असावा असे संशोधकांना वाटते. अर्थातच ते ज्या चॉकलेटचे सेवन करीत होते, ते सध्याच्या चॉकलेटपेक्षा वेगळे होते.
सोळाव्या शतकात स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत आले तोपर्यंत हे वृक्ष मध्य आणि दक्षिण अमेरिकेत सर्वत्र आढळत होते. त्यांच्यामुळेच चॉकलेटची माहिती युरोपपर्यंत पोहोचली आणि सोळाव्या शतकापासून एक पेय म्हणून चॉकलेटचा युरोपमध्ये वापर सुरू झाला. लवकरच तो तिथे तो 'स्टेटस सिम्बॉल'ही बनला. सध्याच्या चॉकलेट बारची निर्मिती सर्वप्रथम सन 1847 मध्ये ब्रिटिश कंपनी 'जे.एस. फ्राय अँड सन्स' ने केली.