

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेत चेन्नई क्विक गन्स संघाने गुजरात जायंटस् संघावर 2 गुणांच्या फरकाने रोमांचक विजय मिळवला. स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी चेन्नई संघाने गुजरातवर 53-51 अशा फरकाने विजय मिळवला.
चेन्नईच्या रामजी कश्यपने उत्कृष्ट खेळी करत सात खेळाडूंना बाद करून 20 गुणांची कमाई केली. वझीर मदनने 11 गुणांची कमाई करून त्याला चांगली साथ दिली. चेन्नईकडून अमित पाटील, विजयभाई बेगड यांनी महत्त्वाच्या क्षणी चेन्नई संघाला महत्त्वपूर्ण बोनस गुण मिळवून दिले. राजूने 3 मिनिटे 56 सेकंद संरक्षण केले. गुजरातकडून अनिकेत पोटेने सर्वाधिक 10 गुणांची कमाई करताना झुंज दिली.
गुजरात संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण करण्याचा निर्णय घेतला व चांगली सुरुवात केली; पण चेन्नईने पहिल्या डावात 21 गुणांसह बोनस गुणदेखील मिळवले.
पहिल्या तुकडीत सागर पोतदारने 1 सेकंदात बोनस गुण मिळवला, तर सुयश गरगटेने 2 मिनिटे 40 सेकंदांत संघाला बोनस गुणांची कमाई करून दिली. प्रत्युत्तरादाखल गुजरातने दुसर्या डावात चेन्नई क्विक गन्सच्या पहिल्या दोन तुकड्या 3 मिनिटे 42 सेकंदांत तंबूत परत पाठवल्या. पॉवर प्ले दरम्यान गुजरात संघाने 22-21 अशी आघाडी घेतली. पण चेन्नईच्या अमित पाटीलने 3 मिनिटे 5 सेकंद संरक्षण करताना 4 बोनस गुण मिळवले.