

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ( चित्रपट महामंडळ ) कार्यकारिणीची बैठक वर्षभर न घेणे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाला संचालकांनी शनिवारी टाळे ठोकले. यानंतर पुणे व मुंबई कार्यालयही बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे कारण सांगत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची ( चित्रपट महामंडळ ) सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आली. विद्यमान कार्यकारिणीची मुदत एप्रिल 2021 मध्ये पूर्ण झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये संचालक मंडळाला कार्यकारिणी बैठक घेऊन सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करावी लागली असती; पण कोरोनामुळे ही बैठक झाली नाही.
या काळात चित्रपट महामंडळाच्या ( चित्रपट महामंडळ ) काही संचालकांनी अन्य संस्थांच्या कार्यकारिणी बैठका होत आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक घेऊन सर्वसाधरण सभेची तारीख जाहीर करण्याची मागणी केली होती; पण त्याची दखल न घेतल्याने कोल्हापुरातील संचालक संतप्त झाले. त्यांनी शनिवारी दुपारी कार्यालयातील कर्मचार्यांना बाहेर काढून उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव यांनी कार्यालयाला टाळे ठोकले.
महामंडळाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केवळ एकच वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजीची भावना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कार्यकारिणी कधी होणार, सर्वसाधारण सभेबाबत काय निर्णय होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
दारावर निवेदन
कार्यकारिणीची बैठक कधी होणार हे जाहीर करावे किंवा अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह यांनी कोल्हापुरात येऊन संचालकांशी चर्चा करावी, यानंतरच कार्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशा मजकुराचे निवेदन उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दारावर चिकटवले आहे.