

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये शनिवारपासून (दि. 11) दोन रुपयांची वाढ केली आहे, अशी माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
म्हैस दुधाला 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये 49.50 व गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर रुपये 37 असा दर राहील. यासंदर्भात सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
चेअरमन पाटील म्हणाल की, दूध उत्पादकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. संघाने खरेदीच्या दरात वाढ केल्यामुळे दूध उत्पादकांना फायदा होणार आहे. सध्या गोकुळचे दैनंदिन दूध संकलन सरासरी 15 लाख लिटर्स आहे. यापैकी म्हैस दूध 8 लाख 50 हजार लिटर्स व गाय दूध 6 लाख 50 हजार लिटर्स इतके संकलन आहे. या दूध दरवाढीमुळे दररोज सरासरी 30 लाख रुपये म्हणजेच प्रति महिना 9 कोटी रुपये रक्कम गोकुळच्या दूध उत्पादकांना दूध बिलापोटी मिळणार आहेत.