कोयना दुसर्‍या लेक टॅपिंगला दहा वर्षे पूर्ण

कोयनानगर : 25 एप्रिल 2012 रोजी झालेले दुसरे लेक टॅपिंग.
कोयनानगर : 25 एप्रिल 2012 रोजी झालेले दुसरे लेक टॅपिंग.
Published on
Updated on

पाटण ; गणेशचंद्र पिसाळ : संपूर्ण जगात नवे आश्चर्य निर्माण करणार्‍या कोयना दुसर्‍या लेक टॅपिंगला दहा वर्षे पूर्ण झाली. भारतीय अभियंत्यांची कसोटी ठरलेल्या या लेक टॅपिंगमुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाला सिंचनासाठी अतिरिक्त पाणी मिळाले. यामुळे उन्हाळ्यात बंद होणारी कोयना चौथ्या टप्प्यातील एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती अखंडित ठेवण्यात यश आले. धरणातील पाण्याच्या थेंबा थेंबाचा सकारात्मक वापर झाल्याने महसुलात अब्जावधींची भरही पडली.

कोयना धरण हे पूर्वी 98.78 टीएमसीचे होते. त्यानंतर धरणाच्या दरवाजांची उंची वाढवत अत्यंत कमी खर्चात व पुनर्वसन कटकटीशिवाय ही साठवण क्षमता 105.25 टीएमसी करण्यात आली. कोयनेच्या पाण्यावर तत्पूर्वी धरणाच्या पोफळी, अलोरे, कोयना

धरण पायथा वीजगृह यातूनच 960 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येत होती. कोयना चौथा टप्प्यानंतर त्यासाठीचे पहिले लेक टॅपिंग 13 मार्च 1999 ला झाले.

मात्र, दुसरे लेक टॅपिंग हे तितकेच धाडसी व आव्हानात्मक होते. त्याचदरम्यान 2009 ला येथे कोयना अभ्यासक दीपक मोडक यांची मुख्य अभियंता म्हणून झालेली निवड यामुळे या आव्हानाला बळकटी मिळाली व तातडीने कामाला जोर आला. पुर्वीच्या बोगद्याला जोडणारा नवीन तीस फूट व्यासाचा साडेचार किलोमीटरचा अंतराचा हा बोगदा तयार करण्यात आला. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात लेक टॅप करायचा अशा पाण्याखालील भागात तेवढ्याच साईजची खोल विहीर काढण्यात आली. जेणेकरून त्या स्फोटानंतर त्याठिकाणची दगड, माती ही त्या विहीरीत जावून बसेल आणि वरील भागातील पाणी हे नवीन बोगद्यातून जुन्या बोगद्याला मिळेल.

यासाठीची स्फोटके स्वीडनहून आणली गेली. त्याव्यतिरिक्त अन्य सर्व तंत्रज्ञान, आव्हान व चिकाटी ही भारतीय तज्ञ व अभियंत्यांची होती ही गौरवास्पद बाब आहे. प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वासावर निर्धारित हे जगातील आश्चर्य ठरलेले दुसरे लेक टॅपिंग 25 एप्रिल 2012 ला यशस्वी झाले. त्यापूर्वी या चौथ्या टप्यासाठीची जलपातळी मर्यादा ही 630 मीटरवरून 618 मीटरपर्यंत खाली आली आणि राज्य अधिकाधिक प्रकाशमय होतानाच कोयना, महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

या दुसर्‍या लेकटॅपमुळे धरणातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सकारात्मक वापर झालाच शिवाय पूर्वेकडे सिंचनासाठी वाढती मागणी टेंभू, ताकारी, म्हैसाळ आदी प्रकल्पांसाठी अतिरिक्त पाणी मिळाले. पूर्वेकडील सिंचनासाठीची वाढती गरज भागविताना पश्चिमेकडील कोयना चौथा टप्पा व पर्यायाने ऐन उन्हाळ्यात बंद होणारी तब्बल एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती अखंडित सुरू राहीली.

निम्याहून अधिक महाराष्ट्राला प्रकाश मिळाला व शासनाला अब्जावधींचा महसूल मिळाला. या प्रकल्पासाठी जेवढा खर्च गृहीत धरण्यात आला होता, त्याहीपेक्षा कमी खर्चात हा प्रकल्प यशस्वी करण्याचे अग्निदिव्यही पार पडले.

अभियंत्यांनी आव्हानात्मक काम यशस्वी केले

वीजगृह सुरू होताना बोगद्यातील जलप्रवाह वाहता होईपर्यंत जनित्रांना तातडीचा पाणीपुरवठा करण्यासाठी दाब बोगद्यांच्या मुखाजवळ उल्लोळ विहीर बांधण्यात आलेली असते. जलाशयाची पाणीपातळी 12 मीटरने उतरल्यामुळे हा पाणीसाठा कमी पडू नये, म्हणून मूळच्या उल्लोळ विहिरीजवळ एक विस्तारीत उल्लोळ दालन बांधण्यात आले. हे दालन मूळ बोगद्याला जोडणे हे सर्वात अवघड काम होते. परंतु, येथील अभियंत्यांनी हे आव्हानात्मक कामही यशस्वी करून दाखवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news