सिंधुदुर्ग : खोल समुद्रातील मच्छीमारी उद्यापासून होणार बंद

देवगड; सूरज कोयंडे : खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय 1 जूनपासून बंद होत असल्याने नौका किनार्यावर घेण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मच्छीमारी हंगाम संपल्यामुळे लिलाव सेंटरही बंद होणार आहे. त्यामुळे गजबजाट असलेल्या देवगड बंदरावर आता दोन महिने शुकशुकाट दिसणार आहे. ऑक्टोबरपासून देवगड बंदर पुन्हा गजबजू लागेल.
देवगडमधील खोल समुद्रातील मच्छीमारी व्यवसाय 1 जूनपासून बंद होत आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रातील मच्छीमारी बंद असल्यामुळे बंदरातील नौका किनार्यावर घेण्याचा प्रक्रियेला वेग आला आहे. बहुतांशी नौका किनार्यावर घेतल्या आहेत, तर उर्वरीत नौका किनार्यावर घेण्याची प्रक्रिया सुरू असून, आठ- दहा दिवसांत नौका किनार्यावर घेणे, जाळी धुणे, नौका शाकारणी ही कामे आटोपून उर्वरित खलाशीवर्ग आपल्या गावी परतणार आहेत. एप्रिल व मेचा पहिला पंधरवडा हा मच्छीमारी हंगामासाठी महत्त्वाचा हंगाम समजला जातो. या हंगामात मोठ्या प्रमाणावर मासळी मिळते तसेच याच हंगामात मुंबईकर चाकरमानी आलेले असल्याने मासळीला स्थानिक बाजारपेठेत दर देखील चांगला मिळत असतो मात्र शेवटच्या टप्प्यात मासळी मिळत असताना शासनाने 1 जूनपासून समुद्रातील मच्छीमारी बंदी कालावधी जाहीर केल्यामुळे मच्छीमारांचा व या व्यवसायावर अवलंबून असणारे इतर व्यावसायिकही निराश झाले.
यांत्रिकी नौकांची हंगामाची सुरुवात चांगली झाली. मात्र, मधील काळ निराशाजनक गेला. शेवटच्या टप्प्यात चार दिवस चांगली मासळी मिळत होती. यामध्ये सरंगा, सुरमई, पापलेट, कोळंबीचा समावेश होता मात्र यांत्रिकी नौकांसाठी शेवट चांगला होत असताना 1 जूनपासून मच्छीमारी व्यवसाय बंद होणार असल्याने निराशाजनक ठरला.कांडाळी मच्छीमारी व्यवसायाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांगडा, सौदांळा आदी चांगली मासळी मिळत असल्याने हा हंगाम चांगला गेला असे स्थानिक मच्छीमार तसेच देवगड मच्छीमार संस्थेचे चेअरमन द्विजकांत कोयंडे यांनी सांगितले.फायबर पातीद्वारे करण्यात येणारी न्हैय मच्छीमारी व्यवसायानेही आटोपती घेतली असून नौकेवरील जाळी काढून ती धुणे व सुकविण्याची मोहिम वेगात सुरू आहे.जेसीबीद्वारे नौका किनार्यावर काढणे सर्वच द़ृष्टिने फायदेशीर ठरत असल्याने जेसीबीचा वापर अधिक प्रमाणात होत आहे.तरीही अडचणीच्या जागेत घेण्यात येणार्या नौकांना मनुष्यबळाचाच आधार अजूनही घ्यावा लागत आहे.
31 जुलैपर्यंत खोल समुद्रात मच्छीमारी करण्यास बंदी असल्यामुळे ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरुवात होईल. मात्र, बहुतांशी खलाशीवर्ग गणेशोत्सव झाल्यानंतरच नौकांवर रूजू होत असल्याने गणेशोत्सवानंतरच खर्या अर्थाने मच्छीमारी हंगामाला सुरुवात होईल.