

भिलवडी; पुढारी वृत्तसेवा : औदुंबर दत्त मंदिर पाण्याखाली गेल असून भिलवडीतही ग्रामस्थांना इशारा देण्यात आला आहे.
येथील कृष्णा नदीपात्रात पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पाणी शिरले. सहा तासात पाणी पातळी पंधरा फुटांनी वाढली.
सायंकाळी पाच वाजता भिलवडी पुलाजवळ पाणी पातळी 31 फूट होती. कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड व पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, भिलवडीचे तलाठी गौस मोहम्मद लांडगे यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. भिलवडी बाजार पेठेतील व्यापार्यांनी बाहेर पडावे. मौलानानगर तसेच भिलवडी परिसरातील पाणी शिरते तेथील ग्रामस्थांनीही बाहेर पडावे, असे आवाहन अधिकार्यांनी केले. सेकंडरी स्कूल येथे लोकांची सोय करण्याच्या दृष्टीने पाहणी केली.
वाळवा तालुक्यात 29 तलाव ओव्हरफ्लो
इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा
दमदार पावसामुळे वाळवा तालुक्यातील सर्व 29 पाझर तलाव व बंधारे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे विहीर बागायती क्षेत्र असलेल्या भागात उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावलाआहे.
तालुक्यात रेठरेधरण व कार्वे येथे मोठे तर अन्य भागात 26 लहान असे 29 पाझर तलाव आहेत. शंभरापेक्षा अधिक बंधारे आहेत. आता सर्व पाझर तलाव व बंधारे भरत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे तलाव-बंधार्यातील पाणी साठवण क्षमताही वाढली आहे. त्यामुळे विहीर बागायती क्षेत्र असलेल्या भागातील भूजल पातळी वाढली आहे. परिणामी उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई गेल्या तीन वर्षांपासून जाणवलेली नाही.
जून महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीने लहान तलाव भरले होते. मोठ्या तलावातही चांगला पाणीसाठा झाला होता. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे सर्व तलाव तुडुंब भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाई दूर होणार आहे.
चांदोली धरणाचे दरवाजे उघडले
वारणावती : पुढारी वृत्तसेवा
चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. बुधवारी सकाळी आठ ते गुरुवार सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 185 मिलिमीटर तर आज सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर असा 32 तासात एकूण 260 मिलिमीटर पाऊस येथे बरसला आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे रात्री आठ वाजता धरणातील विसर्ग वाढविण्यात आला. तो 4883 वरून 22 हजार क्युसेक करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वारणा प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
गतवर्षी सहा ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. यावर्षी 14 दिवस आधीच धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात 24 हजार 441 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणार्या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी दोन मीटरने वाढली आहे.
कडेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
कडेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात बुधवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने लोकांची दैना उडाली आहे. गुरुवारी रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. तालुक्यातील अनेक लहान- मोठे ओढे, नाले, ओघळींना पाणी आले आहे. कडेगाव तलाव ओसंडून वाहतो आहे. या तलावाचे पाणी कोतमाई ओढ्यात आल्याने ओढ्याला पूर आला आहे. शहराचा नागपूर वसाहतीचा संपर्क तुटला आहे. ओढ्या पात्राजवळ असलेल्या बालोद्यानामधील खेळणी पाण्याखाली गेली आहेत.
येरळा, नांदणी नद्या, सोनहिरा ओढा, महादेव ओढा यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या पावसाने आडसाली ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यामुळे अनेक ठिकाणी ऊस पीक भुईसपाट झाले आहेत. मात्र खरीप पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे.
ओढ्यावर पूल बांधण्याची मागणी दुर्लक्षित
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात शहरातील कोतमाई ओढ्याला पूर येतो. त्यामुळे नागपूर वसाहतीचा संपर्क वारंवार तुटतो. त्यामुळे येथे नवीन पूल व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. मात्र त्याकडे नगरपंचायत प्रशासन व बांधकाम खात्याचे दुर्लक्ष आहे.
येरळा नदीला पूर
कडेगाव तालुक्यातील सलग सुरू असलेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील येरळा नदीला पूर आला आहे. तालुक्यातील रामापूर – कमलापूर रस्त्यावरील पूल येरळा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
शिराळा पश्चिम भागातील चार पूल पाण्याखाली
कोकरुड : पुढारी वृत्तसेवा
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागासह वारणा धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिराळा पश्चिम भागातील वारणेवरील चार प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठावरील पिके पाण्यात बुडली आहेत. महापुरासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे या भागात धास्ती आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात चार दिवसात दिवसरात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीला पूर आला आहे. आरळा-शितूर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, बिळाशी-भेडसगाव हे चार पूल पाण्याखाली गेले आहेत.
काळूंद्रे (ता. शिराळा) येथील उबाळे वस्तीत नदीचे पाणी घुसले आहे.त्यामुळे शेतकर्यांनी जनावरे गावात स्थलांतरित केली आहेत. नदी काठावरील ऊस, मका, भात ही सर्व पिके धोक्यात आली आहेत.