

आजरा ; पुढारी वृत्तसेवा : गवसे येथील आजरा सहकारी साखर कारखान्यातील सहा बेअरिंग चोरी प्रकरणी आजरा पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये या चोरीची फिर्याद देणार्या तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालकांचा समावेश आहे. या पाच जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्क्रॅप खरेदीदार जैनुल शमशाद ऊर्फ बाबा खान (वय 54, रा. पुजारी मळा, इचलकरंजी), तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण (52, रा. पेद्रेवाडी, ता. आजरा), स्टोअर किपर दिनकर ऊर्फ गुलाब बाबुराव हसबे (53, रा. चांदेवाडी, ता. आजरा), सुरक्षा मुख्याधिकारी भरत गणपती तानवडे (62, रा. देवर्डे, ता. आजरा) व सुरक्षा रक्षक मनोहर यशवंत हसबे (49, रा. चांदेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
आजरा कारखान्यात 17 फेब—ुवारी 2019 ते 26 जुलै 2021 या कालावधीत सहा बेअरिंगची चोरी झाली. यामध्ये 270 किलोच्या चार तर 92 किलोच्या दोन बेअरिंगचा समावेश होता. त्याची किंमत 3 लाख 5 हजार 200 रुपये आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने चौकशी समिती नेमून 34 जणांवर ठपका ठेवला होता. तर कारखाना कामगार संघटना व इतरांच्या निवेदनामुळे तपासाला वेग आला. आजरा पोलिसांनी 60 हून अधिक जणांची चौकशी केली. गेट पास रजिस्टरमध्ये खाडाखोड आढळली.
स्क्रॅप खरेदीदार खान यांनी तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक चव्हाण, स्टोअर किपर हसबे व मुख्य सुरक्षा अधिकारी तानवडे यांनी हे बेअरिंग नेण्यास सांगितल्याचे पोलिसांना सांगितले. आजर्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी या प्रकरणी आणखी काही जणांना लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगितले.
अनेक कामगारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास..
कारखान्यातील बेअरिंग चोरी प्रकरणी कारखाना प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने 34 कर्मचार्यांवर ठपका ठेवला होता. यामध्ये अनेक निरपराध कर्मचारी संशयाच्या भोवर्यात होते. पोलिसांच्या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतल्यामुळे अनेक निरपराध असलेल्या कामगारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.