

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : कोरोनामुळे दहावी बारावीच्या परीक्षा होणार की नाही ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान या परिक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (दि.१६) दिली. (10th-12th exam)
दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत.
त्याचबरोबर बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन या परीक्षा नियमित पद्धतीने होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. असे ही त्या म्हणाल्या.
इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षांचा तपशील ही त्यांनी दिला आहे.