

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा बाजारपेठ सुशोभिकरणाचे काम करणारा ठेेकेदार हा काही जिल्हा परिषदेची कामे करणारा ठेकेदार नाही. तो अनेक हेरिटेज वास्तूंची कामे करणारा देशातील नामांकित ठेकेदार आहे. सुशोभिकरणाचे काम हे उत्तम दर्जाचे करून घेणे ही आमची जबाबदारी असून हे काम युध्दपातळीवर करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. येथील खादी ग्रामोद्योग भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत राजेंद्रकुमार जाधव, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पोलिस निरीक्षक संदीप भागवत उपस्थित होते.
मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या सुचनेनुसार तयार केलेल्या आराखड्यानुसार बाजारपेठ सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यास कोविड 19 मुळे विलंब झाल्याने जिल्हा प्रशासनाने हे काम आता विनाविलंब युध्द पातळीवर पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदारास दिले आहेत. त्यानुसार येथील बाजारपेठेत खोदकाम करण्यात येणार होते. परंतु, बाजारपेठेतील व्यापारी संघटनेने या कामाला विरोध करून हे काम पावसाळ्यानंतर करावे, अशी मागणी केली होती. त्यावर आपली भूमिका जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केली.
बाजारपेठ सुशोभीकरण व इतर कामांबाबत काही शंका असतील तर त्याचे निरसन केले जाईल. परंतु विरोध करून कामाला विलंब करणे हे योग्य नाही. ना. उध्दव ठाकरे यांनी या कामाला प्राधान्य देण्याच्या सुचना केल्या आहेत. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनीही या प्रकल्पाचा आराखडा पाहिला आहे. आ. मकरंद पाटील यांनी सुशोभिकरणाच्या कामाला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
महाबळेश्वरच्या मुसळधार पावसात काम करणे अवघड आहे याची आम्हाला कल्पना आहे. परंतु, हे आव्हान स्विकारूनच आम्ही कामाचे नियोजन केले आहे. संपूर्ण बाजारपेठेत एकाच वेळी खोदकाम केले जाणार नाही. बाजारपेठेची चार भागात विभागणी करण्यात आली आहे. सागर हॉटेल ते पल्लोड क्रियेशन, भाजी मार्केट ते छ. शिवाजी महाराज चौक, नटराज चिक्की ते पोलिस ठाणे व आर के पाटील ते छ. शिवाजी महाराज चौक असे ते भाग आहेत. या प्रत्येक भागात वीस वीस मीटर खोदकाम करून ते काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काम सुरू करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
हातगाडी व टपरी धारकांना पर्यायी जागा देण्याची आमची जबाबदारी नाही. परंतु, गोरगरीबांच्या पोटाचा प्रश्न आहे ही बाब लक्षात घेवून आम्ही त्यांचे योग्य जागी पुनर्वसन करणार आहोत. बाजारपेठेतील व्यापारी संघटनेने या बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे या बैठकीस काही स्थानिक व्यापारी उपस्थित होते. या व्यापार्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उत्तरे दिली. व्यापारी वर्गासोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर उपाय काढला जाईल. त्यासाठी बैठक घेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित व्यापार्यांनी आमच्या उतार्यावरील शासकिय नोंदी कमी कराव्यात, बाजारपेठ हेरीटेज यादीतून वगळण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले.