

कातरखटाव ; पुढारी वृत्तसेवा : कातरखटाव (ता. खटाव) येथील भरवस्तीत असणारे एक बंद घर आज अज्ञात चोरट्यांनी लक्ष केले. चोरट्यांनी दिवसाढवळ्या हे बंद घर फोडून घरातील सुमारे 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचा ऐवज तसेच 30 हजार रुपयांची रोख रक्कमही लंपास केली. दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीने नागरिक भयभीत झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कातरखटाव येथील तानाजीराव देशमुख यांच्या घरापासून जवळच मुख्य रस्त्यावर केशव मेडिकल हे दुकान आहे. तर देशमुख यांचे विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस केशव निवास हे दुमजली घर आहे. घराच्या परिसरात दाट लोकवस्ती आहे.
देशमुख सकाळी मेडीकलमध्ये आले होते. तर सौ. देशमुख या सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घर बंद करुन मेडीकलमध्ये गेल्या होत्या. त्यांचा मुलगा तेजस हादेखील काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरासमोर त्यांचे पाळीव कुत्रे बांधले होते. देशमुख दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजा उचकटलेला व त्याचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच त्यांचे कुत्रे देखील त्याठिकाणी निपचीत पडले होते. त्यावरून त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. चोरट्यानी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकले होते. चोरट्यानी सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने व 30 हजारांची रोेखड लंपास केली. भर लोकवस्तीत दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी घटनास्थळी भेट देवून ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.