सांगली : ‘डायल 112’…पोलिसांची मदत मिळवा!

सांगली : ‘डायल 112’…पोलिसांची मदत मिळवा!
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी तसेच घटनास्थळी पोहोचण्यासाठी राज्यातील पोलिस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने '112' क्रमांक डायल करा; अवघ्या दहा मिनिटात पोलिस घटनास्थळी दाखल होतील.

गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत करण्यासाठी 'डायल 112' ही नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली आहे. याचे नियंत्रण नवी मुंबई व नागपूरमधून होत आहे. 24 तास ही 'हेल्पलाईन' सेवा सुरू आहे. ज्या भागातून फोन आला; त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षात नवी मुंबई तसेच नागपूरमधून फोन जाऊन घटनास्थळाचे लोकेशन दिले जाते. त्यानंतर त्या परिसरातील पोलिसांच्या 'बीट मार्शल व्हॅन'ला संदेश देऊन त्यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले जाते.

खून, मारामारी, जबरी, लूटमार, चोरी आदी गंभीर गुन्ह्यात मदत करण्यासाठी '112' ही हेल्पलाईन आहे. मात्र, यासाठी नागरिकांचे फोन येतच नाहीत. किरकोळ तक्रारींसाठी भरपूर फोन येतात. हा फोन नवी मुंबई तसेच नागपूर येथेही जात असल्याने त्याची दखल घ्यावीच लागते.

पोलिस मुख्यालयात 'डायल 112' हा स्वतंत्र विभाग आहे. पोलिस उपनिरीक्षक व 12 पोलिस हवालदार असा स्टाफ आहे, 24 तास हा विभाग सुरू असतो. सातत्याने फोन खणखणत असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून बसावे लागते. दररोज किमान 80 फोन येतात. विशेषत: ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात फोन येतात. सांगली, मिरजेत सातत्याने चोरी, लूटमार, चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडतात. भरदिवसा घडलेले गुन्हे अनेकजण पाहतात. मात्र, 'डायल 112' याची तातडीने माहिती देण्यासाठी कोणीच फोन करीत नाहीत.

गुन्हे घडू नयेत, यासाठी नागरिकांनीही मदत करण्याची गरज आहे. अनेकदा रात्रीच्यावेळी संशयितरित्या फिरणार्‍यांना लोक पकडून बेदम चोप देऊन सोडून देतात. हीच माहिती कळविली तर त्याला पकडून 'रेकॉर्डवर घेता येते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

आटपाडीतील जबरी चोरी रोखली

आटपाडी येथे मध्यरात्री चोरट्यांच्या टोळीने एसटी बस अडवून दगडफेक केली. प्रवाशांना लुटण्याचा टोळीचा बेत होता. बसमधील एका प्रवाशाने मोबाईलवरून 'डायल 112' संपर्क साधला. अवघ्या दहा मिनिटांत पोलिस पोहोचले. तोपर्यंत टोळी अंधाराचा फायदा घेत पसार झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news