

सांगली : विवेक दाभोळे : निर्यात होणार्या साखरेसाठी ऊस उत्पादकांना थेट अनुदानाचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. मात्र त्यासाठी साखर कारखान्यांनी निर्धारित साखर कोटा निर्यात करण्याची गरज आहे. निर्यात अनुदान मिळण्यासाठी एकूण उत्पादनापैकी 12 टक्के साखरेची निर्यात करणे गरजेचे आहे. परंतु जागतिक बाजारात साखरेचे दर कमी असल्याचे बहुसंख्य कारखान्यांकडून निर्यात जेमतेमच होत आहे. दरम्यान, दोन ते दीड वर्ष निर्यात अनुदान मिळाले नसल्याचे कारखानदारांतून सांगण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यात सन 2017 – 2018 च्या हंगामापासून साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चालू हंगामात तर दररोेज साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे. शिल्लक साखरेच्या साठ्यात भरच पडते आहे. तर यातून अपेक्षित परतावा नसल्याने कारखानदार चिंतेत आहेत.
दरम्यान, साखर निर्यात वाढावी यासाठी केंद्र सरकारने मे 2018 मध्ये ऊस उत्पादकाला थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यात गाळप करण्यात आलेल्या प्रतिटनामागे 45 रु. शेतकर्यांना थेट मिळणार होते. मात्र त्यासाठी कारखान्याने एकूण उत्पादनापैकी 12 टक्के साखर निर्यात करण्याची अट घालण्यात आली आहे.
या निर्णयानुसार जे कारखाने हंगाम 2020-21 (म्हणजे 1 ऑक्टोबर 2020 ते 30 सप्टेंबर 2021) या दरम्यान निर्यात कोट्यातील किमान 80 टक्के साखर निर्यात करतील त्याच कारखान्यांना अनुदान मिळणार आहे.
साखर निर्यात गरजेची आहे. खरे तर साखर निर्यातीवरील बंधने हटवून निर्यात पूर्ण खुली करण्याची मागणी सर्वप्रथम शेतकरी संघटनेने केली होती. या हंगामात साखरेचा मोठा शिल्लक साठा राहील हे गृहित धरून साखर, इथेनॉल, निर्यातीबाबतचे धोरण सरकारने निश्चित करण्याची गरज आहे.
– संजय कोले,
नेते, शेतकरी संघटना
सन 2019-2020 पर्यंत केंद्र सरकार साखर निर्यातीस रुपये 1044 अनुदान देत होते. ते पुढे कमी करण्यात आले. मध्यंतरी रुपये 600 अनुदान जाहीर केले होते. ते आता रुपये 400 केले. दीड वर्षांपासून तर ते मिळालेच नाही. देशातील अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात अनुदान सुरू करायला हवे. साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल रुपये 3400 आहे. तो किमान 3600 करावा, अशी साखर कारखानदारांची मागणी आहे.
जिल्ह्यात सन 2010- 2011 या वर्षांत 14 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यावेळी या 14 कारखान्यांनी 70 लाख 1 हजार 875 टन ऊस गाळप करताना 82 लाख 60 हजार 660 क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. सन 2015 – 2016 मध्ये 16 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. तर 70 लाख 88 हजार 884 टन उसाचे गाळप होऊन 84 लाख 66 हजार 312 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. सन 2020 -2021 च्या हंगामात 18 पैकी 15 साखर कारखान्यांनी गळित हंगाम घेतला. या कारखान्यांमध्ये 80 लाख 9 हजार 13 टन उसाचे गाळप होऊन 94 लाख 93 हजार 566 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.