

ऐतवडे बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुकसह वारणाकाठच्या गावांत उसावर हुमणी कीड व लोकरी माव्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. याचा शेतकर्यांना मोठा फटका बसू लागला आहे.
या सार्याच भागात हुमणी, लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकरीवर्गासमोर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. ऊस लावणीचा खर्च आवाक्यात राहिलेला नाही. यातून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगाप सोयाबीन, भुईमूग पिकात भांगलण, कोळपणी सुरू आहे, पण पिके मात्र काही ठिकाणी पिवळे पडू लागली आहेत.
खोडवा ऊस तोडल्यानंतर गडबडीने त्यातच परत ऊस लागण केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून उसावर मावा रोगाने संक्रात आणली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे या वातावरण बदलामुळे चक्क वारणा पट्ट्यासह तालुक्यातच हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उसाची मुळे खात आहेत. त्यामुळे शेंAड्याला मावा आणि बुडक्याला हुमणी असा काहीसा प्रकार फडात दिसून येत आहे. त्यामुळे ऊस पीक धोक्यात आले आहे. याकडे शेती विभागाने लक्ष देऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होऊ लागली आहे.