शशीकलांच्या ‘कमबॅक’वरून संघर्ष

शशीकलांच्या ‘कमबॅक’वरून संघर्ष
Published on
Updated on

अण्णा द्रमुक पक्षातील एक गट विरोधात असतानाही शशीकला या नाराज नाहीत आणि त्यांनी 28 जून रोजी चेन्‍नईसह अन्य ठिकाणी मोठा रोड शो केला. पनीरसेल्वम यांचा गट हा शशीकला यांना अण्णा द्रमुक पक्षात सक्रिय करण्याच्या बाजूने आहे; पण पलानीसामी यांचा शशीकला यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध आहे. तमिळनाडूत विरोधी पक्ष अण्णा द्रमुकमध्ये धुसफूस सुरूच आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे जयललिता यांची मैत्रिण व्ही. के. शशीकला यांच्या वापसीसाठी सुरू असलेले प्रयत्न. शशीकला यांच्यामुळे अण्णाद्रमुकमधील दोन गटांतील मतभेद उघडपणे व्यक्‍त होऊ लागले आहेत. दि. 5 डिसेंबर 2016 रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी पक्षाच्या बैठकीत ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि शशीकला यांचे नाव पुढे केले. त्यांना विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात आले.

परंतु, कायदेशीर अडचणींमुळे ही निवड स्थगित करावी लागली. त्यानंतर दि. 14 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 66.65 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शशीकला यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर सत्तेवर असलेले अण्णा द्रमुकचे वरिष्ठ नेते पनीरसेल्वम आणि पलानीसामी यांनी तमिळनाडूचा कारभार पाहिला. दि. 27 जानेवारी 2021 रोजी बंगळूरच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शशीकला यांनी शांत राहणेच पसंत केले.

शशीकला नटराजन तीस वर्षे जयललिता यांची सावली बनून राहिल्या. जयललिता यांच्या आजाराबाबत कमालीची गुप्तता त्यांनी पाळली होती. जयललितांच्या अंत्यसंस्कारावेळीही त्यांनी परिस्थितीवरची आपली पकड जराही ढिली करू दिली नव्हती. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींतही स्वत:चे वर्चस्व राखत त्यांनी राज्याची घडी बसवली. कोणत्याही प्रकारच्या फाटाफुटीला किंवा नेतृत्वाबाबतच्या शंकाकुशंका उपस्थित करायला त्यांनी वावच दिला नाही. कमालीच्या वेगाने आणि तितक्याच थंडपणाने कोणताही गवगवा न करता त्या निर्णय घेत गेल्या आणि अण्णा द्रमुकचे सगळेच नेते त्यांच्या हो ला हो करत गेले. आता पुन्हा त्या पक्षाशी वाटाघाटी करत आहेत. पक्षातील एक गट त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परिणामी, पक्षांतर्गत तणाव पुन्हा निर्माण झाला आहे.

दि. 5 मार्च 2022 रोजी शशीकला यांनी दोन दिवसांच्या धेनी, मदुराई, डिंडिगुळ, तिरुनेलवेली जिल्ह्यातील दौर्‍यात समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे बंधू ओ. राजा यांच्यासह पक्षाच्या धेनी जिल्ह्यातील 30 हून अधिक पदाधिकार्‍यांनी चेन्‍नईच्या एका हॉटेलमध्ये शशीकला यांची भेट घेतली. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते संतापले. या तीस पदाधिकार्‍यांची हकालपट्टी केली. या कारवाईनंतर पलानीसामी म्हणाले की, पक्षात शशिकला यांना कोणतेही स्थान नाही. पलानीसामी यांनी 23 जून रोजी पक्षाची महापरिषद बोलावली होती. या परिषदेला सुरक्षेच्या कारणावरून परवानगी देऊ नये, अशी मागणी पनीरसेल्वम यांनी पोलिसांकडे केली आणि तेथून वाद पुन्हा पेटला. पनीरसेल्वम यांचा गट हा शशीकला यांना अण्णा द्रमुक पक्षात सक्रिय करण्याच्या बाजूने आहे; पण पलानीसामी यांचा शशीकला यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध आहे. तो आता सार्वजनिक रूपातून व्यक्‍त होत आहे.

काही काळापूर्वी धेनी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकारिणीने पलानीसामी यांच्या विरोधी भूमिका घेत एक प्रस्ताव मंजूर केला. जे पक्षातून सोडून गेले आहेत, त्यांना परत आणणारा हा प्रस्ताव होता. या ठरावावर पलानीसामी यांनी तीव्र नाराजी व्यक्‍तकेली. पक्षात अशी स्थिती निर्माण होईल की, पनीरसेल्वम हे एकाकी पडू शकतात, असा इशारा पलानीसामी यांनी दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत पलानीसामी यांचा प्रभाव असलेल्या पश्‍चिम तमिळनाडूत पक्षाने 50 पैकी 33 जागा जिंकल्या. त्याचवेळी पनीरसेल्वम यांचा प्रभाव असलेल्या दक्षिण तमिळनाडूत अण्णा द्रमुकने 58 पैकी केवळ 18 जागा जिंकल्या.

या निकालानंतर पलानीसामी हे पक्षाचे नेतृत्व करतील अणि पनीरसेल्वम हे विरोधी पक्षाची भूमिका वठवतील, हे सिद्ध झाले. अण्णा द्रमुक पक्षातील एक गट विरोधात असतानाही शशीकला या नाराज नाहीत आणि त्यांनी 28 जून रोजी चेन्‍नईसह अन्य ठिकाणी मोठा रोड शो केला. यावेळी त्यांनी पक्षाची बांधणी ही एका नेतृत्वाखाली केली जाईल, असा दावा केला. सध्याची राजकीय स्थिती पाहता ओ. पनीरसेल्वम अणि ई. पलानीसामी हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे भविष्यात तमिळनाडूच्या राजकारणात काय उलथापालथ होईल, हे आताच सांगणे कठीण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news