शरीराला ‘ड ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता किती आहे? त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात ‘या’ समस्या

शरीराला ‘ड ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता किती आहे? त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतात ‘या’ समस्या
Published on
Updated on

लहानांपासून ते थोरांपर्यंत 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. सूर्याच्या किरणांमध्ये हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. भारतासारख्या देशात, जिथे भरपूर सूर्यप्रकाश आहे, तेथे 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता आजिबात भासू नये, अशी अपेक्षा असते; पण दुर्दैव असे की, भारतात 'ड' जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण चिंता करावी इतके मोठे आहे.

'ड' जीवनसत्त्वाबद्दल आपण खूप ऐकतो. त्याची शरीराला आवश्यकता किती आहे आणि त्याच्या अभावापायी अनेक मुलांच्या तब्येतीच्या तक्रारी कशा उद्भवतात याचीही चर्चा आपण खूप वेळा ऐकली आहे. 'ड' जीवनसत्त्वाच्या मदतीने शरीरात कॅल्शियम तयार होते आणि कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. कॅल्शियमचा अभाव असेल तर हाडे दुबळी होतात आणि ती मोडूही शकतात. त्याचबरोबर कॅल्शियमचा अभाव असेल, तर हाडे ठिसूळ बनतात. 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये रिकेटसचा धोका उत्पन्न होतो. हे जीवनसत्त्व प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. हृदय, रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण होऊ शकतो. या जीवनसत्त्वामुळे शरीरातील कॅल्शियमचा स्तर नियंत्रित केला जातो.

'ड' जीवनसत्त्व हे चरबीत विरघळून जाऊ शकणार्‍या प्रो हार्मोनचा एक समूह असतो. हे दोन प्रकारांत असते. व्हिटॅमिन डी 2 किंवा अर्गोकेलसीफेरोल आणि व्हिटॅमिन डी 3 किंवा कोलेकेलसीफेरोल.

हे जीवनसत्त्व अंड्याचा पिवळा भाग, माशाचे तेल, लोणी, दूध आणि उन्हात शेकण्याने मिळवता येते.

हे जीवनसत्त्व योग्य प्रमाणातच घेणे आवश्यक आहे. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास कोलेस्टरॉल वाढणे, रक्तदाब वाढणे, हृदयविकार वगैरे रोग बळावतात. पोटासंबंधी विकार, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्याही उद्भवू शकतात.

मात्र 'ड' जीवनसत्त्वाची शरीराला आवश्यकता असतेच. बाहेरच्या संसर्गाला रोखणार्‍या टी पेशींची सक्रियता 'ड' जीवनसत्त्वाच्या मदतीने वाढवता येते.

प्रतिकार शक्ती आणखी मजबूत करण्यात 'ड' जीवनसत्त्वाची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकून घेण्याने 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता बर्‍याच प्रमाणात कमी होते.

आतापर्यंत झालेल्या संशोधनात आढळून आले आहे की, 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव असेल, तर कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, मल्टिपल स्क्लेरोसीस आणि अशा तर्‍हेचे अनेक विकार जडू शकतात. रिकेटससारख्या विकारापेक्षाही या विकारांच्या प्रतिबंधासाठी 'ड' जीवनसत्त्वाची आवश्यकता जास्त असते. सध्या वाढत चाललेले शहरीकरण, शारीरिक हालचालींचा अभाव, सूर्यप्रकाशात न येणे या सगळ्यामुळे 'ड' जीवनसत्त्वाचा अभाव आपल्याकडे दिसून येतो. वास्तविक पाहता भारतात सूर्यप्रकाश भरपूर आहे; पण सौंदर्याच्या वेडगळ कल्पना आणि प्रदूषणाची भीती यामुळे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्याचीच प्रवृत्ती आढळून येत आहे. उन्हात फिरताना सगळे शरीर झाकून घेण्याची सवय लोकांना लागली आहे. कडाक्याच्या उन्हात हे ठिक आहे; पण सर्वसामान्य उन्हात, विशेषत: थंडीच्या दिवसांत याची गरज नसते. काही काळ तरी तुम्ही सूर्यप्रकाशात वावरले पाहिजे. 'ड' जीवनसत्त्वाचा हा नैसर्गिक स्रोत आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या खुळचट जाहिरातींना फसून अनेक तरुणी सूर्यप्रकाशापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतात; पण हे चुकीचे आणि आरोग्याला घातक आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

लहान मुलांना 'ड' जीवनत्त्वाची अधिक गरज असते. याचा अभाव असेल, तर मुलांना रिकेटस किंवा मुडदूस नावाचा विकार होतो. यात मुलांची हाडे ठिसूळ आणि कमजोर बनतात. मुलांचे पाय वाकडे होतात, शरीराच्या मानाने डोके मोठे होते, कपाळ पुढे येते. या मुलांचे स्नायूही योग्य तर्‍हेने विकसित होत नाहीत. मोठ्या लोकांमध्ये याच विकाराला ऑस्टिमेल्सिया असे म्हणतात. 'ड' जीवनसत्त्व किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा विकार झाला असेल, तर आहारात त्याची पूर्तता करून हा विकार बरा करता येतो आणि मुलांची हाडे मजबूत करता येतात. मुडदूस या रोगाची लक्षणे सहज लक्षात येऊ शकतात शरीराचा विकृत बनत जाणारा आकार याचबरोबर दातांत पोकळी निर्माण होणे, एनामलचा अभाव आणि दातांचा विकास उशिरा होणे हे दोषही दिसू लागतात.

हाडे आणि पायांत मंद किंवा मध्यम स्वरूपाच्या वेदना होतात. लहान मुलांच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे ती तेवढ्याचसाठी. नवजात बालकांना आईच्या दुधातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते; पण बाळ जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्याचा आहारही परिपूर्ण करण्याची आवश्यकता असते. आहारात दूध आणि दुधाच्या पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश केला जावा, जेणेकरून मुलांना 'ड' जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळेल. मुलांना सूर्यप्रकाशात खेळण्यासाठी आवर्जून पाठवावे. कारण, यातून 'ड' जीवनसत्त्वाची पूर्तता नैसर्गिकरीत्या होत असते.

भारतात सूर्यप्रकाश भरपूर आहे. आपल्याकडचे लोकही सावळ्या रंगाचे असतात. उन्हात प्रमाणापेक्षा जास्त काळ घालवल्याने शरीरावर परिणाम होतात; पण शरीरावर आजिबात ऊन न घेतल्याचेही घातक परिणाम होतात. लहान वयात जशी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते तशीच ती प्रौढपणीही असते आणि म्हणूनच सूर्यप्रकाश अंगावर घेणे योग्य ठरते. 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच समस्या निर्माण होतात. आवश्यक तेवढे 'ड' जीवनसत्त्व आहारातून आणि सूर्यप्रकाशातून मिळवणे म्हणूनच आवश्यक ठरते.

-डॉ. महेश बरामदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news