रामदास कदम आघाडीतील सूर्याजी पिसाळ : संजय कदम

रामदास कदम आघाडीतील सूर्याजी पिसाळ : संजय कदम
Published on
Updated on

खेड : पुढारी वृत्तसेवा
रामदास कदम हेच आघाडी सरकारमध्ये सूर्याजी पिसाळ असून त्यांचे व किरीट सोमय्या यांचे कनेक्शन असल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे. शनिवारी नजीकच्या भरणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम, प्रसाद कर्वे व किरीट सोमय्या यांच्या दूरध्वनी संभाषणांच्या क्लिप ऐकवून त्यांनी हा आरोप केला.

माजी आमदार संजय कदम म्हणाले की, रामदास कदम व प्रसाद कर्वे, प्रसाद कर्वे व किरीट सोमय्या यांच्यामधील संभाषण हे धक्कादायक आहे. एका बाजूला कोकणात कोरोना व चक्रीवादळ यामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आहे, अशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व उद्योजक सदानंद कदम हे पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. परंतु, त्याचवेळी किरीट सोमय्या यांच्यासारख्यांना हाताशी धरून महाविकास आघाडीतील रामदास कदम यांच्यासारखे सूर्याजी पिसाळ व प्रसाद कर्वे यांच्यासारख्या अनाजी पंत हे कोकणातील पर्यटन व्यवसायिकांना स्वतःचा राजकीय सूड उगवण्यासाठी अडचणीत आणत आहेत.

रामदास कदम यांनी सोमय्या याना प्रसाद कर्वे यांच्या मार्फत माहिती पुरवली हे त्यांच्यात झालेल्या संभाषण ऐकल्यावर स्पष्ट होत आहे. अनिल परब यांचे वांद्र्याचे ऑफिस तुटताना रामदास कदम यांना आनंद होतो, मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटताना ते गप्प बसतात. या सर्व गोष्टीतून ते केवळ राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी पक्षात, आघाडीत राजकारण करत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यांनी राजकारण जरूर करवे परंतु स्वतःला शिवसैनिक म्हणवणे सोडावे. एका बाजूला मी कधीच निवडणूक लढवणार नाही हे जाहीर करायचे आणि दुसर्‍या बाजूला कोकणातील पर्यटन व्यावसायिक उध्वस्त होतील याचा कोणताही विचार न करता घाणेरडे राजकारण करायचे याचा आम्ही निषेध करतो, असे कदम म्हणाले.

रामदास कदम हे शिवपिंडीवर बसलेला विंचू असून आघाडीतील सूर्याजी पिसाळ आहेत. त्यांच्याबाबत वेळीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी सावध होणे गरजेचे आहे.

कोकणातील नेते म्हणवणारे हे लोक केवळ स्वार्थी असून रामदास कदम यांना कोकणी जनता नक्की धडा शिकवेल. आघाडीतील घटक पक्षाचा माजी आमदार म्हणून ही बाब मी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

मुबई येथे अनिल परब यांचा बंगला तुटला अशा वेळेस त्यांचे बाजूने एकही प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली नाही. मात्र, बंगला तुटल्यानंतर आनंदउत्सव मात्र साजरा केला.मंत्रिपद गेल्याने राजकारणाची एकही संधी रामदास कदम सोडत नाहीत.दोन्ही पिता पुत्रांनी शिवसेनेला संपविण्याचा जणू विडा उचलला आहे ,असे ही कदम यांनी बोलताना सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर बदनामीसाठी कारस्थान

माझ्या मंत्रिपदाच्या काळात कोकणातील पर्यटन उद्योग वाढावा, यासाठी सीआरझेडमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी मीच प्रयत्न केला होता. दापोली तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीत स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. राज्याचे मंत्री अनिल परब यांच्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

त्यामुळे याबाबत बोलणे उचित नाही. पत्रकार परिषदा घेऊन स्थानिकांचा कैवार घेतलेल्यांनी येणार्‍या निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, असे शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे.

राष्ट्रवादी माजी आमदार संजय कदम व मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रामदास कदम, प्रसाद कर्वे व किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. या पत्रात रामदास कदम यांनी नमूद केले आहे की, खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत.

माजी आमदार संजय कदम व वैभव खेडेकर हे दोघेही पत्रकार परिषदा घेऊन माझ्यावर बेछूट बिनबुडाचे आरोप करीत आहेत. या पूर्वी प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या ऑडीओ क्लीप सोशल मीडियामध्ये व्हायरल करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी मुस्लिम बाधवांबद्दल मी काही चुकीचे बोललो, अशा आशयाची व्हीडिओ क्लीप आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही महाभागांनी ऐन निवडणुकीच्यावेळी पसरवली. वातावरण गढूळ करण्याचे काम केले होते, असे कदम यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
भगव्याशी गद्दारी करून इतर पक्षात गेलेल्यांनी शिवसेनेची चिंता करण्याची गरज नाही. माझे पुत्र व दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी "समुद्र किनारी असलेल्या एकाही हॉटेल व्यवसायिकाला मी धक्का लागू देणार नाही" असे यापूर्वीच जाहीररित्या सांगितले आहे.

त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांच्या पाठीशी आमदार योगेश कदम उभे आहेत. त्यामुळे केवळ राजकारणाकरिता आरोप करणार्‍यांना कोकणवासीय माफ करणार नाहीत, असे कदम यांनी या पत्रकात शेवटी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news