

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील शहरे पुन्हा गजबजू लागली आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी होताच मेट्रो शहरांमधील वाहतूक देखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मेट्रो शहरातील वाहतुकीवर देखरेख ठेवणारी जागतिक तंत्रज्ञान संस्था टॉमटॉम इंटरनॅशनलकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार नवी दिल्लीतील वाहतूक सामान्य स्थितीच्या ६३ टक्क्यांपर्यंत पुर्वपदावर आली आहे.
मुंबईतील वाहतूक ५२ टक्क्यांपर्यंत पूर्वपदावर आल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीतील वाहतुकीने मुंबईलादेखील मागे सोडले असल्याचे दिसून आले आहे.
सर्च इंजिन 'गुगल'च्या ३० जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार ऑफिसमधील वर्दळ जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. किराणा, फार्मसी सह इतर आवश्यक साहित्याच्या खरेदीकरिता बाहेर पडणार्यांच्या संख्येत ११.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
किरकोळ तसेच मनोरंजनाकरिता बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत अजूनही ३२ टक्क्यांपर्यंतची घट आहे. देशात कोरोना महारोगराईची संभावित तिसरी लाट येवू शकते. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. अशात ७५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जाण्यास सुरूवात केली आहे. मेट्रो शहरांमध्ये वाहतुकीची वर्दळ वाढली आहे.
चार जुलैला संपलेल्या आठवड्याच्या आधारे भारतात ४३१.३ कोटी यूनिट वीज निर्मिती करण्यात आली. गत आठवड्यात वीजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनासंबंधी प्रतिबंध काही प्रमाणात हटवण्यात आले आहेत. आर्थिक गाडी देखील त्यामुळे रूळावर आली आहे. अनेक कारखाने, उद्योग सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसातील मागणी पूर्ण करण्यासाठी काही उद्योगांनी उत्पादनाला वेग दिला असल्याचे दिसून आले आहे. अशात वीजेची मागणी वाढली आहे.
https://youtu.be/zsTDTlgm3Uo