

करमाळा : पुढारी वृत्तसेवा जूनचा अर्धा महिना संपत आला अद्याप पावसाची पत्ता नाही, पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीअभावी जिल्ह्यात करोडोंची खते पडून आहेत. अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. गतवर्षा या दरम्यान जवळपास पेरण्यात झाल्या होत्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकर्यांसह खतविक्रेते हवालदिल झाले आहेत. रोहिणी नक्षत्राच्या वादळी पाऊसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून पाऊस गायब झाला आहे. पावसाने आता मृग नक्षत्रात दांडी मारल्याने बळीराजासह व्यापारी वर्गही हतबल झाल्याचे चित्र आहे. अन्नदाता आता पाऊसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
मृग संपायला आता दोन-चार दिवसांचा अवधी असून आगाताची पिके आता घेता येणार नाहीत. पाऊस झाला तरी वाफसा व पेरणी चा कालावधी अधिक असल्याने खरिपाची उडीद, मूग, मटकी, हुलगा आदी पिके घेता येणे शक्य नाही. तूर, मका, कांदा या पिकांशिवाय कोणतेही पीक घेणे मुश्कील होणार आहे. याबरोबरच करोडो रुपयांचे बियाणे पडून राहिल्याने व शेतकरी बी-बियाणे खरेदीलाच न आल्याने खते-बियाणे विक्रेते हवालदिल झाले आहेत, तर शेतकरी पाऊस नसल्याने हतबल झाला आहे. मान्सून ने हुलकावणी दिल्याने नदींचे व विहिरींचे पाणी अटत चालले आहे, तर पूर्वभागात सीना कोरडी पडली आहे. त्यामुळे विहिरींचे पाणीही आटत चालले असून विंधन विहिरीची पाण्याची पातळी खालवली आहे. अनेक ठिकाणी विंधन विहिरींचे पाणी गायब झालेचे शेतकरी वर्ग सांगू लागले आहेत.
मृगनक्षत्र कोरडे गेल्याने आगात पिकाची पेरणी होणार नाही. त्यामुळे खरिपाच्या पिकामुळे मिळणार्या उत्पन्नापासून बळीराजा आता वंचित राहणार आहे. यावर्षी हवामान खात्याचे सर्व अंदाज चुकलेले असून 18 जून उजाडले तरी पावसाला सुरुवात न झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. दुसर्या बाजूला खते-बियाणे यांचा कोट्यवधी रुपयांचा साठा पडून असल्यामुळे कृषी व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. करमाळा तालुक्यात खरिपासाठी जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून दरवर्षी उडीद, तूर, सूर्यफूल, मका, सोयाबीन, कांदा या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. केवळ तीन महिन्यांत नगदी रक्कम हातात येत असल्यामुळे शेतकर्यांचा खरीप पिकाचा हंगाम महत्त्वाचा ठरत असतो.
साधारणत: मृग नक्षत्रापासून म्हणजेच आठ जूनपासून पेरणी हंगाम सुरू होतो. पूर्वमोसमी पावसावरच जमीन थंड होऊन मृगाच्या पावसावर बियाणे उगवून येते, असा आजपर्यंतचे चक्र आहे. मात्र यावर्षी 17 जून तारीख उलटली तरी मान्सून हुलकावणीच देत आहे. गतवर्षी उडीद बियाण्यांची प्रचंड टंचाई झाली होती. उडिदाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला होता.विदर्भातून बियाणे करमाळा बाजारात अनधिकृत पणे विकले गेले होते. यावर्षी मात्र उलट परिस्थिती आहे. प्रमाणापेक्षा जास्त बियाणे बाजारात उपलब्ध असूनही खरेदीदार शेतकरी नसल्यामुळे बियाण्यांचे भाव घसरले आहेत.
21 तारखेपर्यंत मृग नक्षत्राची तारीख असून त्यानंतर आर्द्रा नक्षत्राचा कालावधी सुरू होणार आहे. अजूनही बळीराजाला पाऊसाची अपेक्षा आहे. अजून आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर संपूर्ण खरीप हंगामच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिली. दररोज ढग येतात पण पाऊस पडत नाही. करमाळा तालुक्यात अद्याप एकदाच रोहिणी नक्षत्राचा वादळी व नुकसानकारक पाऊस झाला आहे. त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. कसलाच पाऊस झालेला नसल्याने एक एक दिवस बळीराजा चातकाप्रमाणे पाऊसाची वाट पहात आहे.