माझी आई – हिराबा!

माझी आई – हिराबा!
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांना शुक्रवारी देवाज्ञा झाली. आपल्या आईबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या भावना.
माँ किंवा माता – शब्दकोशातला हा फक्त एक शब्द नाही. हा शब्द सर्व प्रकारच्या भावनांचा समावेश करतो.- प्रेम, संयम, विश्वास हे सारेच त्यात सामावले आहे. मुलांना त्यांच्या आईबद्दल विशेष भावना असते. त्याला कोणत्याही देश-प्रदेशाचे बंधन नसतेच. आपल्या मुलाला जन्म देण्याबरोबरच आई हाच पहिला गुरू असतो. आई जसे मुलाचे मानस, त्याचे व्यक्तिमत्त्व बनवते तसेच त्याला आत्मविश्वासही देते. या प्रक्रियेत आई निःस्वार्थपणे तिच्या वैयक्तिक गरजा व आकांक्षांचा त्याग करते. माझ्या आयुष्यात जे काही चांगले घडले , मी घडलो आणि माझ्या चारित्र्याला आकार दिला आहे, ते माझ्या पालकांचे संस्कार आहेत, यात मला शंका नाही. यात माझी आई सर्वोच्चस्थानी आहे. आता दिल्लीत असतानाही भूतकाळातील आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत.

साधी तरीही विलक्षण

माझी आई हिराबा साधी पण विलक्षण होती. इतर सर्व आईंप्रमाणे! मी माझ्या आईबद्दल लिहित असताना मला खात्री आहे, तुमच्यापैकी अनेकांना माझ्या आईशी संबंधित गोष्टी स्वत:च्या आईशी जोडल्या गेल्या असतील. आपण या लेखासह आपल्या आईची प्रतिमा देखील पाहू शकता. आईच्या तपश्चर्येने चांगला माणूस घडतो. त्यांच्या भावना मुलांमध्ये मानवी मूल्ये आणि संवेदनशीलता यांसारखे गुण रुजवू शकतात. आई ही एक वेगळी व्यक्ती किंवा वेगळे व्यक्तिमत्त्व नाही. मातृत्व हा एक गुण आहे. देव त्याच्या भक्तांच्या स्वभावानुसार हे गुण निर्माण करतो, असे आपण अनेकदा ऐकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या माता आणि त्यांचे मातृत्व आपल्या स्वभावानुसार आणि मानसिकतेनुसार अनुभवतो. हा खरेच दैवी अनुभवच.

माझ्या आईचा जन्म विसानगर, मेहसाणा, गुजरात येथे झाला, हे गाव माझ्या वडनगर गावापासून जवळ आहे. तिला स्वतःच्या आईचे प्रेम मिळाले नाही. लहान वयात तिच्या आईचा स्पॅनिश फ्लूच्या साथीने मृत्यू झाला. तिला माझ्या आजीचा चेहराही आठवत नाही. माझ्या आजीच्या कुशीत घालवलेल्या बालपणीच्या आठवणीही आईकडे नाहीत. माझ्या आईने तिचे संपूर्ण बालपण आईशिवाय घालवले. आपल्या सगळ्यांना मिळणारा लाडकोड माझ्या आईला अनुभवायला मिळाला नाही. आम्ही आमच्या आईच्या कुशीत शांतपणे झोपायचो, माझ्या आईला ती दिव्य अनुभूती आईच्या मांडीवर मिळू शकली नाही. माझ्या आईला शाळेतही जाता येत नव्हते. त्यामुळे तिला लिहिता-वाचता येत नव्हते. त्यांचे बालपण गरिबीत गेले आणि सर्व सुखसोयी किंवा लाडापासून वंचित राहिले.

अशा संघर्षांमुळे आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे, माझ्या आईला तिचे बालपण अनुभवता आले नाही. तिला तिच्या वयाहून अधिक प्रौढ होण्यास भाग पाडले गेले. ती तिच्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती आणि लग्नानंतर ती आमच्या कुटुंबातील सर्वात मोठी सून झाली. अनेक जबाबदार्‍या आणि दैनंदिन संघर्ष असूनही माझ्या आईने संयमाने आणि दृढनिश्चयाने संपूर्ण कुटुंबाला सांभाळून ठेवले. आमचे कुटुंब वडनगरमधल्या एका छोट्या घरात राहत होते, ज्याला एक खिडकीही नव्हती. शौचालये किंवा स्नानगृहांसारख्या सुखसोयींचे काय? आम्ही आमच्या घराला एक खोलीची सदनिका म्हणायचो. मातीच्या भिंती आणि छतावर पाईप्स, असे आमचे घर होते. आम्ही सगळे – माझे आईवडील, माझी भावंडे आणि मी त्यात राहत होतो.

माझ्या आईला सहज स्वयंपाक करता यावा म्हणून माझ्या वडिलांनी बांबूच्या काड्या आणि लाकडी फळ्यांपासून तात्पुरता किचनकट्टा बनवला होता. तेच आमचे स्वयंपाकघर होते.आम्ही सगळे कुटुंब बसून एकत्र जेवायचे. माझी आईही तितकीच काटक. ती वडिलांसोबत उठायची आणि सकाळी अनेक कामे पूर्ण करायची. धान्य दळण्यापासून ते तांदूळ आणि डाळी निवडण्यापर्यंत. तिची आवडती भजने आणि कीर्तन गुणगुणत वडील कामावर जायचे. त्यांना गुजरातचे आदिकवी नरसिंग मेहता यांचे एक भजन आवडे – 'जलकमल चंडी जाने बाला, स्वामी अमरो जगशे.' आम्हा मुलांनी आमचा अभ्यास सोडून घरकामात मदत करावी, अशी अपेक्षा आईने कधीही केली नाही. मात्र, उभयतांची मेहनत पाहून त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे आम्हाला वाटत असे. मी आमच्या गावच्या तलावात पोहण्याचा आनंद घ्यायचो. त्यामुळे घरातील सर्व कपडे मी तलावावर नेऊन धुवत असे. माझ्यासाठी ते रोजचे काम झाले… घरचे कपडे धुतले गेले आणि माझी पोहण्याची आवडही पूर्ण झाली. आमचा घरखर्च भागवण्यासाठी माझी आई काही घरात स्वयंपाकाचे काम करायची. आमच्या कुटुंबाच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लागावा म्हणून ती वेळ काढायची. ती लोहारकामापासून कापड कातण्यापर्यंतची सर्व कामे करायची.

स्वाभिमानी आणि स्वावलंबी

माझी आई स्वाभिमानी आणि स्वावलंबी होती. इतरांना तिचे काम करण्याची विनंती तिने कधीच केली नाही. पावसाळ्यात आमच्या मातीच्या घरात अनेक समस्या निर्माण झाल्या. शर्थीचे प्रयत्न करूनही आमचे जुने घर मान्सूनच्या पावसात तग धरू शकले नाही. पावसाळ्यात आमचे छत ठिबकून घर भरून जायचे. पावसाचे पाणी जमा करण्यासाठी आई छताखाली बादल्या आणि भांडी ठेवायची. या प्रतिकूल परिस्थितीतही आई खंबीर राहिली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की हे पाणी पुढील काही दिवस वापरण्यात यायचे… रेनवॉटर हार्वेस्टिंगचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असेल!

माझी आई धान्याचा एक दाणा वाया जाणार नाही, याची काळजी घेत असे. जेव्हा ती शेजारच्या लग्नांना उपस्थित राहत असे, तेव्हा आम्हाला आठवण करून देत असे, की अनावश्यक काहीही घेऊ नका. घरात एक नियम होता – जेवढे खाऊ शकाल तेवढेच घ्या.

अब्बासची विशेष काळजी

माझी आई इतरांच्या आनंदात आनंद मानत असे. माझ्या वडिलांचा जवळचा मित्र जवळच्या गावात राहत होता. त्या मित्राच्या अकाली निधनानंतर माझ्या वडिलांनी त्यांचा मुलगा अब्बास याला आमच्या घरी आणले. अब्बासने आमच्यासोबत राहून शिक्षण पूर्ण केले. माझ्या आईला तिच्या मुलांइतकेच अब्बासचे प्रेम आणि काळजी होती. दरवर्षी ईदच्या दिवशी ती अब्बासच्या आवडीचे पदार्थ बनवायची. सणासुदीच्या वेळी, आमचे घर शेजारच्या मुलांचे आवडते ठिकाण होते आणि ते माझ्या आईने बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत असत. आमच्या शेजारी जेव्हा कधी एखादा साधू यायचा, तेव्हा आई त्याला आमच्या साध्या घरात जेवायला बोलवायची आणि त्या भिक्षूंना स्वतःऐवजी आपल्या मुलांना आशीर्वाद देण्याची विनंती करायची. माझ्या आईने माझ्या क्षमतेवर आणि तिने मला दिलेल्या सद्गुणांवर नेहमीच विश्वास ठेवला.

मूळ गुजराती लेखावरून केलेला मराठी अनुवाद : सौ. सुरेखा चंद्रशेखर जोशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news