

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 25 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी 7 वाजता होेणार्या या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला येत असताना 'शिवसंग्राम'चे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. आता गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच सारथी संस्थेचे सक्षमीकरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी, मराठा आरक्षण अस्तित्वात असताना सरकारी सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, शिष्यवृत्ती आदी मुद्द्यांबाबतही समाधानकारक निर्णय न झाल्याने मराठा समाजात अस्वस्थता आहे. या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार, वीरेंद्र पवार, आबासाहेब पाटील, दिलीप पाटील, 'छावा'चे नानासाहेब जावळे-पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या विविध जिल्ह्यांतील समन्वयकांना निमंत्रित करण्यात आले आहे.