मधुमेह हा हृदयविकाराइतकाच गंभीर आजार

मधुमेह हा हृदयविकाराइतकाच गंभीर आजार
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांना आपल्याला मधुमेह आहे हेच माहिती नसते. मधुमेह हा हृदयविकाराइतकाच गंभीर आजार आहे. त्याचे गांभीर्य वेळीच ओळखण्याची आवश्यकता आहे, असे भारतातील प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. रिसर्च सोसायटी ऑफ स्टडी ऑफ डायबिटीज इंडियाच्या विभागीय परिषदेसाठी पद्मश्री डॉ. जोशी सोलापूरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. राहुल मेडीदार उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. जोशी म्हणाले, जगभर मधुमेहाचे रूग्ण वेगाने वाढत आहेत. भारतातील मधुमेही रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मधुमेही रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे जीवनशैलीत झालेला बदल हे मधुमेहाचे सगळ्यात मुख्य कारण आहे. व्यायामाचा अभाव, अवेळी जेवण, कमी झोप, तणाव ही मधुमेहाची कारणे आहेत. शेकडो वर्षांपूर्वी भारतात लिहिल्या गेलेल्या 'चरक संहिता' या ग्रंथातही मधुमेहाविषयी बहुमूल्य मार्गदर्शन करण्यात आले आहे, असेही पद्मश्री डॉ. जोशी यांनी सांगितले.

मधुमेहाची विशेष लक्षणे दिसत नसल्यामुळे 50 टक्के रुग्णांना मधुमेह झाल्याचे कळत नाही. मोबाईल, संगणक किंवा इतर गॅझेटचा अतिवापर झाल्यामुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. याउलट असंतुलित आहार, फास्ट फूडचे सेवन प्रमाणापेक्षा अधिक होत असल्यामुळे मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. योगासने, व्यायाम वेळेवर झोप, आनंदी राहणे, वेळेवर जेवण, सावकाश खाणे, सूर्यनमस्कार करणे या उपायांनी संभाव्य मधुमेह नियंत्रित करता येऊ शकतो. तसेच ज्यांना मधुमेह झाला आहे अशांनीही पथ्ये पाळली आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले तर मधुमेह आटोक्यात येतो, असेही पद्मश्री डॉ. शशांक जोशी म्हणाले.

मधुमेहींना हृदयविकाराची शक्यता

मधुमेही रुग्णांना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम याद्वारे मधुमेह नियंत्रित ठेवणे अत्यंत अत्यावश्यक आहे, असेही पद्मश्री डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.

मधुमेहींना जाणवत नाहीत वेदना

मधुमेह झालेल्या व्यक्तींना अनेकदा वेदना झाल्याचे जाणवत नाही. त्यामुळे आघात, जखम याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे असेही पद्मश्री जोशी यावेळी म्हणाले.

'डायबेटिक रिव्हर्सल' शक्य

सध्या 'डायबेटिक रिव्हर्सल' ची चर्चा असते. डायबेटिक रिव्हर्सल म्हणजे गोळ्या घेणे बंद होणे. योग्य उपचार, योग्य आहार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यावर आधारित 'डायबेटिक रिव्हर्सल' योग्य आणि शक्य आहे असे पद्मश्री डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news