

वॉशिंग्टन ः कोरोना, हंता आणि मंकीपॉक्सनंतर आता अमेरिकेत 'पॉवासन' विषाणूची चर्चा होत आहे. अमेरिकेत या विषाणूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकार्यांनी 'टिक-बोर्न पॉवासन व्हायरस'च्या संसर्गामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. हा विषाणू असलेला किडा चावल्यावर त्याचा संसर्ग होत असतो.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेली महिला 90 वर्षांची होती. मे महिन्याच्या सुरुवातीला तिला या विषाणूची लागण झाली आणि 17 मे रोजी तिचा मृत्यू झाला. यावर्षी कनेक्टिकटमधील या विषाणूने बाधित होणारी ती दुसरी महिला असल्याचे सांगण्यात आले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पॉवासन व्हायरस हा 'फ्लॅव्ही व्हायरस' आहे. हे विषाणू प्रामुख्याने उत्तर अमेरिका आणि रशियाच्या सुदूर पूर्वेकडे आढळतात. पॉवासन विषाणूचे नाव ओंटारियोतील पॉवासन शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
1958 मध्ये एका लहान मुलामध्ये हा विषाणू आढळला होता. त्याचा या विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला. उत्तर अमेरिकेत दोन प्रकारचे पॉवासन विषाणू आढळतात. एक म्हणजे 'लायनेज-1' आणि दुसरा 'लायनेज-2'. अमेरिकेच्या आरोग्य विभागानुसार विषाणूची लागण झालेला कीटक चावल्याने पॉवासन व्हायरस रोग होऊ शकतो. काही लोकांमध्ये त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत तर काहींमध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या, मेंदूज्वरसारखी लक्षणे दिसतात. या विषाणूमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो.