भारतीय शेअर बाजाराचा वॉरेन बफे राकेश!

भारतीय शेअर बाजाराचा वॉरेन बफे राकेश!
Published on
Updated on

भारताचे वॉरेन बफे असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 व्या वर्षी आपली जीवनयात्रा थांबवली व बाजार, स्त्रिया, हवामान व मृत्यू याबाबत अंदाज बांधणे शक्य नसते, या त्यांच्या सुप्रसिद्ध वाक्याला सत्य ठरवले. 1960 मध्ये राजस्थानी कुटुंबातील राधेश्याम व ऊर्मिला यांच्या कुटुंबात राकेश यांचा जन्म झाला व मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे पदवी घेतल्यानंतर इंडियन चार्टर्ड अकौंटंट संस्थेतून त्यांनी सीएची पदवी घेतली. वडील राधेश्याम हे आयकर अधिकारी होते व सतत शेअरबाजार व आर्थिक घडामोडी यावर ते मित्रांसोबत चर्चा करीत. त्याचा परिणाम राकेश यांच्यावर झाला व शेअर बाजाराचे आकर्षण निर्माण झाले; परंतु वडिलांनी त्यांना पैसे व परवानगी दिलीच नाही. मित्रांकडूनही पैसे घेण्यास प्रतिबंध केला. परंतु शेअर बाजाराचे आकर्षण व धाडसी वृत्ती यातून कॉलेजमध्ये असतानाच वयाचा रौप्यमहोत्सव किंवा आपल्याकडील गद‍्धेपंचवीशी साजरी करताना त्यांनी मित्रांकडून 5000 रुपये उसने घेतले व त्यातून टाटा टी चा शेअर 43 रु. ना खरेदी केला तो 3 महिन्यांत 145 रु. झाला. मित्रांना उसने पैसे घेताना बँक एफडीपेक्षा चांगला परतावा देण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण केले व 5 लाखांचा घसघशीत नफा मिळवला. यशासारखे यशदायी काहीच नसते. यानंतर केवळ 1986 ते 1989 या तीन वर्षांत 25 लाखांचा नफा त्यांनी मिळवला व भारतीय शेअरबाजाराला बिग बुल प्राप्‍त झाला.

पत्नी रेखा व स्वतः राकेश यांची अद्याक्षरे घेऊन ठअठए ही खर्‍या अर्थाने हिर्‍याप्रमाणे दुर्मीळ ठरणारी गुंतवणूक संस्था स्थापन केली. अ‍ॅपटेकचे चेअरमन तसेच हंगामा डिजिटल मीडिया, जियोजित, प्राज इंडस्ट्रीज, प्रोव्होग, नागार्जुन कन्स्ट्रक्शन, व्हायसरॉय हॉटेल अशा अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून कार्य करीत असतानाच आपली गुंतवणूक 2018 मध्ये 18,000 कोटी, तर 2022 मध्ये 47,000 कोटींपर्यंत वाढवली. 2008 च्या जागतिक वित्त संकटात 30 टक्क्यांनी नुकसान पत्करले तरी 2012 पर्यंत त्याची पूर्ण भरपाई केलीच. एका नोकरदार अधिकार्‍याचा मुलगा ते आशियातील 36 व्या क्रमांकाचा श्रीमंत ही वाटचाल थक्‍क करणारी आणि प्रेरक आहे.

धाडस हेच भांडवल धाडस या भांडवलावर कुशलतेने बाजाराचा अंदाज घेत हर्षद मेहताच्या घोटाळा कालखंडातही उत्तम कमाई करण्याचे कसब राकेश यांनी दाखवले. याबाबत खरेदीपेक्षा विक्रीतून त्यांनी अधिक कमाई केली. व्यवसायात नावीन्य हवे, नवे क्षेत्र हवे, या विचारातून गगनाला गवसणी घालणारी आकाश ही हवाई वाहतूक कंपनी 2020 मध्ये नोंदवली व सर्व सोपस्कार पूर्ण करीत 3 विमानांच्या सहाय्याने 7 ऑगस्ट रोजी हवाई सेवा सुरू केली आणि दैवदुर्विलास म्हणजे त्यानंतर केवळ एक आठवड्यातच त्यांची इहलोकाची यात्रा संपली.

नव्या गुंतवणुकीबाबत त्यांना अनेकांनी सावधानतेचा इशारा दिला. मात्र, प्रयत्न करून अपयश आले तरी चालेल; परंतु प्रयत्न न करताच मी अपयश स्वीकारणार नाही, या प्रेरणेने भारताच्या हवाई प्रवासात कार्यक्षम, स्वस्त व उत्तम सेवा देणारी आकाश ही सेवा त्यांनी कार्यरत केली. भविष्यात वेगाने विकास करण्याचे स्वप्न त्यांची टीम पूर्ण करेल. परंतु भारतीय शेअर बाजारात अत्यंत विश्‍वास असणारी व सकारात्मक शक्‍ती असणारी बिग बुल किंवा बिग बुलचा राजा अकाली निघून जाणे धक्‍कादायकच ठरते.

– प्रा. डॉ. विजय ककडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news